मुंबई: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाशी युती करणार्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला होता. परंतु, शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी त्याचीही पत्रास न बाळगता संजय राऊत यांच्या सल्ल्यालाही केराची टोपली दाखवली.
‘शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल’, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. याशिवाय, शरद पवार यांच्याशी अत्यंत जवळीक असणार्या संजय राऊत यांनीही प्रकाश आंबेडकरांना सांभाळून बोलण्याचा सल्ला देत त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर राऊतांच्या वक्तव्याला फारसे महत्व न देता, मला हा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला असता तर तो मी मानला असता, अशा शब्दात पार इज्जत काढली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. त्यांच्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी अशी वक्तव्यं करणे योग्य नाही. शरद पवार हे राज्यातीलच नव्हे तर देशातील उत्तुंग नेते आहेत. देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जात असताना त्याचे स्तंभ शरद पवार आहेत. महाविकास आघाडीत सामील होण्याच्या तयारीत असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याविषयी आदर ठेऊन बोलले पाहिजे’, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. परंतु, यावर प्रकाश आंबेडकर यांनी नमते घेण्याची भूमिका सोडाच पण संजय राऊत यांच्या शिवसेनेतील (ठाकरे गट) स्थानाबाबत आणि अधिकारांविषयी शंका उपस्थित केली.