मुंबई : शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांनी शिवसेने बाबत केलेली एक भविष्यवाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी २० वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांना शिवसेना आणि भाजपा बाबत एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रमोद महाजन यांनी एक भाकीत केलं होतं. तेच भाकित आज तंतोतंत खरं ठरलं आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
केंद्रात अटलबिहरी वाजपेयी यांच्या सरकार असतांना मुबंईमधील एका पार्टीमध्ये तत्कालिन मंत्री प्रमोद महाजन यांना राजदीप सरदेसाई यांनी एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती दिसून येत आहे. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत राजदीप सरदेसाई ही आठवण सांगतांना म्हणाले की, ‘देशात अटलबिहारी वाजपेयीचं सरकार होतं. त्या काळात मुंबईचे शेरीफ नाना चुडासमा होते. त्यांच्या घरी एक पार्टी होती. प्रमोद हे मंत्रिमंडळातलं मोठं नाव होतं.
मी त्या पार्टीत असताना प्रमोद महाजन यांना विचारलं की दिल्लीत तुम्ही क्रमांक एकचा पक्ष आहात आणि वाजपेयींच्या नेतृत्त्वात निवडणुका लढवत आहात पण महाराष्ट्रात तुम्ही लहान भाऊ आहात. तुमचा मोठा भाऊ तर महाराष्ट्रात शिवसेना आहे. त्यावर प्रमोद महाजन मला म्हणाले की जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात लहान भाऊ आहोत. ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे नसतील त्यानंतर हिंदुत्वाच्या या युतीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष होईल आणि शिवसेना क्रमांक दोनचा पक्ष असेल.’
सध्या राज्यात भाजपा मोठ्या भावाच्या भुमिकेत वावरत आहे. उध्दव ठाकरे यांच्या गटाची काय अवस्था झाली आहे, हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. यामुळे प्रमोद महाजन यांनी केलेलं भाकित खरं ठरलं आहे अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. याबद्दलचे मिम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.