मुंबई : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्षांवर कुणाचा दबाव आहे का? असा सवाल केला होता. आता भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवेंनी वायफळ बडबड करु नये, असे ते म्हणाले आहेत. नांदेड येथे बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार अपात्रतेचे प्रकरण न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. परंतु, आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीला विलंब होत असल्याची तक्रार ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांवर कुणाचा दबाव आहे का? असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले होते.
यावर प्रतिक्रिया देताना खासदार प्रताप चिखलीकर म्हणाले की, “विधानसभा आणि लोकसभा वेगळी आहे. लोकसभेच्या अध्यक्षांचा सन्मान सर्वांनी केला पाहिजे. जेव्हा एखादी याचिका विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणीसाठी जाते, तेव्हा ते न्यायमुर्तींच्या भूमीकेत असतात. आपण एखाद्या न्यायमुर्तींबद्दल बोलतो हे अतिशय चुकीचे वाटते. त्यामुळे अंबादास दानवेंनी वायफळ बडबड करु नये असे मला वाटते,” असे प्रताप चिखलीकर म्हणाले.
प्रताप चिखलीकर यांनी महिलांना मिळालेल्या आरक्षणावरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मीच नाही तर संपूर्ण भारतात महिला भगिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करत आहेत. ५० वर्षांपासून चर्चेत असलेले, २०-३० वर्षांपासून होऊ घातलेले महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे देशात अतिशय उत्साह आहे.” असेही ते म्हणाले.