तरुण भारत लाईव्ह | श्रीहरीकोटा : भारताच्या चांद्रयान ३ मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचं विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. रशिया या देशानेही लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ती मोहीम अपयशी ठरली. अशात भारताची चांद्रयान मोहीम ही यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला आहे. भारत असे करणारा जगातील चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, रशिया आणि चीनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग होईल असा विश्वास इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. चांद्रयान २ च्या अपयशातून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. चांद्रयान-3 ने 14 जुलै 2023 पासून पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली. 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी चांद्रयान-3 ला 40 दिवस लागले.
परदेशी मीडियाही भारताच्या चंद्र मोहिमेवर लक्ष ठेवून आहे. अमेरिकन न्यूज चॅनल CNBC चंद्रयान-3 चे लाइव्ह अपडेट्स देत आहे. CNBC ने लिहिले की, ‘भारताचे चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यास भारत इतिहास रचेल. आतापर्यंत कोणताही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करू शकला नाही.
कतारच्या अल्जझीराने लिहिले की, भारताचे चंद्रयान-3 यशस्वी झाले, तर भारत चंद्रावर यशस्वीरित्या उतरलेल्या देशांच्या यादीत सामील होईल. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतामध्ये तुलनेने कमी बजेटचा एरोस्पेस कार्यक्रम आहे. पण भारताचा अंतराळ कार्यक्रम जगातील बड्या अवकाश शक्तींनी केलेल्या मोठ्या अंतराळ मोहिमा वेगाने पूर्ण करत आहे. आतापर्यंत रशिया, चीन आणि अमेरिकेची चंद्र मोहीम यशस्वी झाली आहे.
अल्जझीराने पुढे लिहिले की, भारताने चार वर्षांपूर्वी असाच प्रयत्न केला होता, जो अयशस्वी झाला. त्यावेळी चंद्रयान-2 लँडिंगपूर्वीच कोसळले. भारताच्या चंद्र मोहिमेची किंमत $74.6 मिलियन आहे, जी इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. भारत अतिशय कमी पैशात चंद्र मोहिमा करत आहे, हे अंतराळ अभियांत्रिकीचे कौशल्य आहे.
इंटरनॅशनल न्यूज एजन्सी रॉयटर्सने लिहिले की, चंद्राचा दक्षिण ध्रुव खूप खडबडीत आहे, जिथे उतरणे खूप कठीण आहे. भारताचे चंद्रयान-3 तिथे उतरल्यास ऐतिहासिक क्षण असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी अवकाश प्रक्षेपण आणि उपग्रह-आधारित व्यवसायात गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊ इच्छित आहे. चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यास भारताचा अवकाश शक्ती म्हणून उदय होईल.
ब्रिटनच्या स्काय न्यूजने रशियाच्या चंद्र मोहिमेच्या अपयशाच्या संदर्भात लिहिले की, भारत रशियाला मागे टाकून अंतराळ शर्यतीत मोठी झेप घेऊ शकतो. चंद्रयान 3 चंद्रावर भूकंपाची क्रिया, तापमान आणि किरणोत्सर्गाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी लँडरची रचना करण्यात आली आहे. चंद्राच्या मातीत पाण्याचा, बर्फाचा शोधण्याचाही प्रयत्न केला जाईल. रशियाचे लूना-25 यानही तेच काम करणार होते.
रशियाची चंद्र मोहीम अपयशा झाल्यामुळे सर्वांच्या नजरा भारताच्या चंद्रयान-3 कडे लागल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल. चंद्रयान यशस्वी ठरल्यास भारताचा जगभरात दबदवा वाढणार आहे. अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांच्या अंतराळ संस्था चंद्रयानाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. या सर्व मोठ्या संस्थांमध्ये भारताचेही नाव जोडले जाईल.