पूर्व वैमनस्यातून गोळीबार : एका संशयीताच्या अखेर आवळल्या मुसक्या

तरुण भारत लाईव्ह न्युज भुसावळ : भुसावळातील साकरी-फेकरी उड्डाण पुलाजवळ शुक्रवार, 14 रोजी रात्री 10 वाजता दोन तरुणांवर गोळीबार करून पसार झालेल्या संशयीताच्या वरणगाव येथून यंत्रणेने अखेर मुसक्या बांधल्या आहेत. करण संतोष सपकाळे (खडका, ता.भुसावळ) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. ही कारवाई रविवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने केली. दरम्यान, हल्लेखोर सपकाळे या कट्ट्यातून झाडलेल्या गोळीने पूर्व अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (25, भुसावळ) हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर करणसह तिघे पसार झाले होते.

तिघांविरोधात तालुका पोलिसात गुन्हा
अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (25, भुसावळ) व त्यांचे दोघे मित्र चारचाकी स्वीप्ट (एम.एच.19 डी.व्ही.0071) ने वरणगावकडे जेवणासाठी निघाल्यानंतर दुचाकीला कट लागल्यानंतर संशयितांनी जाब विचारल्यानंतर झालेल्या वादातून संशयित करण संतोष सपकाळे याने दोन गोळ्या झाडल्याने अक्षय व मंगेश जखमी झाले होते. या प्रकरणी करण सपकाळेसह संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पथक येण्यापूर्वी संशयित देत होते गुंगारा
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील, यासीन पिंजारी, रमण सुरळकर तसेच वरणगावचे सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या पथकाने करणला वरणगावातून अटक केली. डीवायएसपी वाघचौरे यांच्या पथकाने भुसावळ तालुक्यातील अनेक जंगलांमध्ये संशयीतांचा पाठलाग केला मात्र पथक येण्यापूर्वी संशयित निसटत होते मात्र अखेर वरणगावातून संशयीताच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले.