प्री वेडिंगचा तमाशा…

.वेध

– प्रफुल्ल व्यास

विवाहात अवाढव्य खर्च करून बाप कर्जबाजारी होतो. वेळप्रसंगी मुलीचे लग्न कसे करावे, या भीतीपोटी अनेकांनी शेवटचे पाऊल उचलले. अनेकांनी शेत विकले, आयुष्यभराची कमाई मुला-मुलीच्या लग्नावर उधळत तो कफल्लकही झाला; म्हणून शासनाने सामूहिक विवाह सोहळ्याची मोहीम अमलात आणली. तर, त्यातही लेकरंबाळं असणारे मायबाप वरवधू म्हणून बोहल्यावर उभे होऊ लागले. आधी शासन आयोजकांना पैसे देत असे. आता ते पैसे वधूच्या किंवा वधुपित्याच्या खात्यात जमा होऊ लागल्याने गेल्या पाच-सात वर्षांत सामूहिक विवाह सोहळ्याचे स्तोम कमी झाले. सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहाचा पैसा वाचावा हाच हेतू होता; परंतु तो साध्य होऊ शकला नाही. कोरोना काळात विवाह समारंभात वर्‍हाड्यांच्या संख्येवर बंधन आणली गेली होती. ती प्रथा आता पुढे चालू राहील आणि विवाह कार्यावर होणारा वारेमाप खर्च कमी होईल, असे वाटत असताना कोरोना काळापूर्वीपेक्षाही धूमधडाक्यात विवाह समारंभ होत आहेत. विवाह हा सोळा संस्कारांपैकी सर्वात महत्त्वाचा संस्कार आहे. दोन परिवार जोडण्यासोबतच कुटुंब वृद्धी हा महत्त्वाचा भाग त्यात दडलेला आहे. (वि. दा. सावरकरांच्या विवाह पत्रिकेत तसा स्पष्ट उल्लेख आहे.) परंतु, या महत्त्वाच्या संस्कारात फॅशनने प्रवेश केला आणि विवाह हा आता इव्हेंट झाला! तो संस्कार नव्हे, ‘खेळ’च झाला आहे.

केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी विवाह सोहळ्यांवर वारेमाप खर्च केला जातो. गेल्या काही वर्षांत अनेक ट्रेंड पुढे आले आहेत. प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग आणि डेस्टिनेशन वेडिंगचे स्तोम वाढते आहे. प्री वेडिंगमध्ये पाश्चिमात्य कपडे घातले जातात. वैयक्तिक फोटोंचे प्रदर्शन विवाह किंवा रिसेप्शनमध्ये लावले जाते. हा एक प्रकारे विवाह संस्कारावर घालाच म्हणावा लागेल. व्यवसाय आणि व्यवहार म्हणून फोटोग‘ाफरने तो केलाच पाहिजे. तो त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. त्या व्यवसायात नफा मिळविण्यासाठी त्यांनी युक्त्याही शोधल्याच पाहिजेत. परंतु, आपण त्यातून नेमके काय चांगले, काय वाईट याचा विचारही केला पाहिजे. आपण समाजात वावरत असताना कसेे राहावे, कसे वागावे याच्या काही मर्यादा असतात. विवाहानंतर चार भिंतीच्या आत होणार्‍या प्रकारांचे जाहीर प्रदर्शन जर प्री वेडिंगच्या माध्यमातून होणार असेल तर त्याला ‘तमाशा’शिवाय पर्यायी शब्द सापडूच शकत नाही. त्यामुळे नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील गुजर समाजाने या प्री वेडिंगवर बंदी घालण्याचा धाडसी निर्णय घेतला असून बलुतेदार समाजही जनजागृती करतो आहे. परंपरेने चालत आलेल्या, परंतु आता अव्यवहार्य वाटत असलेल्या प्रथांना बुरसटलेल्या म्हणून एकीकडे बंद केल्या जात असताना दुसरीकडे मात्र श्रीमंत, उच्चशिक्षित किंवा पुढारलेपणाचा आव आणत नैतिकतेला तिलांजली देणार्‍या प्रथांचा लग्नादी कार्यात प्रवेश होऊ लागला आहे. भंडारा येथे रामनवमीच्या आदल्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत हातात भगवा घेत दुचाकीवर प्री वेडिंग शूट करण्यात आले तर रामनवमीच्या दिवशी रामाच्या शोभायात्रेतच प्री वेडिंगचे फ्लॅश उडवल्या गेले.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एक जोडपे एकाच कंपनीत नोकरीला होते. विवाह जुळल्यानंतर Pre-wedding प्री वेडिंगसाठी गोव्यात गेले. तेथे हॉटेलमध्ये थांबले आणि नंतरच्या प्रकाराने चक्क विवाह तुटण्याची वेळ आली. लग्नापूर्वी मुला-मुलीने फिरायला जाणे म्हणजे दोघांमध्ये संवाद होणे, त्यातून स्वभाव कळणे आणि विचारांचे आदानप्रदान होणे, ही साधीशी गोष्ट होती. परंतु, आता त्याला प्री वेडिंगच्या नावावर ‘निलाजरे’पणा सुरू झाला आहे. पवित्र नात्याला हादरा बसण्याची सुरुवात या प्री वेडिंगपासून सुरू झाली आहे. विवाहापूर्वीच मर्यादा ओलांडण्याची संधी खुलेआमपणे दिली जात आहे. प्री वेडिंग शूट केले नाही तर आपली मागास म्हणून गणना होईल, अशी काहीशी भीतीही सामान्य परिवारातील युवक-युवतींना सतावत आहे. गोतावळ्यापासून दूर जात निसर्गाच्या सान्निध्यात सहजीवनाचं चित्र रंगवण्यासाठी प्री वेडिंग फोटोशूटला पसंती दिली जात आहे. यातून भविष्यात समाजावर विपरीत परिणाम होण्यापेक्षा सुवर्णमध्य साधावा आणि संपूर्ण विवाह हाच मुख्य भाग महत्त्वाचा असावा!

– 9881903765