आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले…

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘इंडिया टुडे’ने ‘सी-वोटर’बरोबर ‘मूड ऑफ द नेशन’ सर्व्हे केला असून या सर्व्हेमध्ये सध्या लोकसभेची निवडणूक झाली तर भाजपाच्या जागा कमी होतील, असा दावा केला आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा जागा राखता आल्या तरी पुरेसे आहे, असे शिंदे म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीने मागील लोकसभेच्या निवडणुकीत जेवढ्या जागा जिंकलेल्या आहेत, आगामी निवडणुकीत तेवढ्यादेखील जागा महाविकास आघाडीला राखता येणार नाहीत. या राज्यामध्ये जे काम आम्ही करतोय, ते पाहून लोक खूश आहेत. लोक सुज्ञ आहेत. मागील अडीच वर्षात कामच झाले नाही. काम न करणार्‍यांना लोक पसंदी देतील की काम करणार्‍यांना लोकांना लोक निवडतील हे सर्वांनाच ठाऊक आहे, अशा भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

त्यांच्या छातीत धडकी बसली आहे. आपल्या पक्षातील कार्यकर्ते दुसर्‍या पक्षात जाऊ नयेत म्हणूनच हे खटाटोप काही पक्ष करत आहेत. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे. ते लोकप्रिय आहेत. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत आधीच्या निवडणुकीतील सर्व विक्रम मोडीत निघतील. मोदी यांच्या नेतृत्वात आम्हाला मोठे यश मिळेल. महाराष्ट्रातही आम्हाला मोठे यश मिळेल. त्यांनी लोकसभेच्या ४ ते ६ जागा राखल्या तरी खूप मोठी बाब होईल, असेही शिंदे म्हणाले.

गेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये जे यश भाजपा आणि शिंदे गटाला मिळाले, त्याची आकडेवारी डोळ्यासमोर ठेवली असती तर अंदाजाला खरा आधार मिळाला असता. आगामी महापालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुका होतील, या निवडणुकीचा निकालाचा सर्व्हे हा सर्वांत मोठा असेल. जे आकडे समोर आले आहेत, ते आता निवडणुका झाल्या तर या गृहितकावर आधारित आहेत. मात्र दीड वर्षांनी निवडणुका होणार आहेत. आघाडी होणार आहे असे गृहित धरून निकालाचे अंदाज बांधने म्हणजे दिशाभूल आहे. राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.