अयोध्येत राम मंदिरानंतर मशीद बांधण्याची तयारी; वाचा सविस्तर

वाराणसी : अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आले आहे. 22 जानेवारीला अयोध्येत भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. राम मंदिर निर्माण कार्य अंतिम टप्प्यात असताना लवकरच मशीद बांधण्याचं कामही सुरु होणार आहे. याचं काम मुंबईच्या टीमकडे देण्यात आलं आहे.

रामजन्मभूमी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे अयोध्येतील धन्नीपूर येथील मुस्लिमांना दिलेल्या जमिनीवर लवकरच मशिदीचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांना मशिदीच्या बांधकाम समितीचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मशीद बांधणाऱ्या ‘इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन ट्रस्ट’चे मुख्य विश्वस्त आणि उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुकी यांनी त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. रामजन्मभूमी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे अयोध्येतील धन्नीपूर येथील मुस्लिमांना दिलेल्या जमिनीवर मशिदीचे बांधकाम पुढील वर्षी मेपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

अयोध्येतील बाबरी मशिदीच्या जागी बांधण्यात येणाऱ्या मशिदीचे नाव ‘मोहम्मद बिन अब्दुल्ला अयोध्या मशीद’ असं ठेवण्यात आलं आहे. पुढील वर्षी मे महिन्यात या मशिदीचे बांधकाम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टने मशिदीची पुनर्रचना केली असून आता ही मशीद 15 हजार चौरस फुटांऐवजी सुमारे 40 हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधली जाणार आहे. सरकारने दिलेल्या जमिनीवर बांधल्या जाणाऱ्या या मशिदीसोबतच हॉस्पिटल, लायब्ररी, कम्युनिटी किचन आणि म्युझियम बांधले जाणार आहे.