नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी आसाममधील तेजपूर येथील वायुसेनेच्या तळावरून ‘सुखोई ३० एमकेआय’ या लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर केली. भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर (प्रमुख) असलेल्या राष्ट्रपतींनी वायुसेनेच्या तळावर परत येण्यापूर्वी हिमालयाच्या सफरी बरोबरच ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यात सुमारे ३० मिनिटे हवाई सफरीचा आनंद लुटला.
भारतीय हवाईदलाच्या ‘१०६ स्क्वॉड्रन’चे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी विमान उडविले. विमानाने समुद्रसपाटीपासून सुमारे दोन किलोमीटर उंचीवर आणि ताशी सुमारे ८०० किलोमीटर वेगाने उड्डाण केले. या अशा प्रकारची हवाई सफर करणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
यावेळी राष्ट्रपतींना विमान आणि भारतीय वायुसेनेच्या परिचालन क्षमतांबद्दलही माहिती देण्यात आली. राष्ट्रपतींनी भारतीय वायुसेनेच्या कार्य सज्जतेवर समाधान व्यक्त केले. ‘सुखोई ३० एमकेआय’ लढाऊ विमानातून राष्ट्रपतींची हवाई सफर घडवणे हा भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर या नात्याने सशस्त्र दलांशी संपर्क ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. यापूर्वी मार्च २०२३ मध्ये राष्ट्रपतींनी आयएनएस विक्रांतला भेट दिली होती आणि स्वदेशी बनावटीच्या विमानातील अधिकारी आणि खलाशांशी संवाद साधला होता.
भारताच्या संरक्षण क्षमतेचा प्रचंड विस्तार – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
‘सुखोई ३० एमकेआय’ लढाऊ विमानातील सफरीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “भारतीय वायुसेनेच्या बलाढ्य ‘सुखोई ३० एमकेआय’ लढाऊ विमानात उड्डाण करणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारताची संरक्षण क्षमता जमीन, हवाई आणि सागरी अशा सर्व सीमांना व्यापून टाकण्यासाठी प्रचंड विस्तारली आहे, याचा मला अभिमान आहे. मी भारतीय वायुसेना आणि तेजपूरच्या तळावरच्या हवाई दलाच्या संपूर्ण टीमचे या सफरीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करते.”