उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला!

वेध

– विजय कुळकर्णी

तीन वर्षांपूर्वी जगावर कोरोनाचे संकट कोसळले. त्यात संपूर्ण जग अक्षरश: ढवळून निघाले. या आपत्तीला भारताने इष्टापत्ती मानून देशाच्या आरोग्य यंत्रणेत आमूलाग्र बदल केले. कोरोना काळात प्राणवायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर काही महिन्यातच देशातील सर्वच जिल्हा  आरोग्य केंद्रात केंद्र सरकारने व काही सामाजिक संघटना, दानशूरांच्या मदतीने प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आले. या महामारीपूर्वी पीपीई किटदेखील आपल्या देशात तयार होत नव्हती. मात्र, महामारीमुळे पीपीई किट, कृत्रिम श्वसन यंत्र (व्हेंटिलेटर), प्रतिबंधक लस शोधून त्याचा यशस्वी प्रयोग व वापर भारताने सर्वप्रथम केला. त्यामुळे या महामारीला अल्पकाळात व यशस्वीपणे आपण रोखू शकलो. तसेच, या महामारीपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले. विलगीकरण, लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले. प्रदीर्घकाळ टाळेबंदी देशाने पाळली. कारण या विषाणूपासून होणार्‍या आजारावर औषधच नसल्याने केवळ प्रतिबंध हाच एकमेव उपाय होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन देशवासीयांनी प्रतिबंधात्मक उपायांचे तंतोतंत पालन केले. त्यामुळेच आज आपला देश पुन्हा सावरून सक्षमपणे उभा झाला आहे.

हे सर्व आठवण्याचे व सांगण्याचे कारण म्हणजे आज 7 एप्रिल रोजी  जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात आहे. 1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने पहिली जागतिक आरोग्य सभा आयोजित केली होती. त्यात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर 7 एप्रिल 1950 रोजी पहिला जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून या तारखेला हा दिवस जगभर साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या काळजीचे प्राधान्य क्षेत्र अधोरेखित करण्यासाठी विशिष्ट आरोग्य विषयांबद्दल जागरूकता वाढविणे, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. समाजात आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत प्रत्येकाने सावध असणे आवश्यक आहे. म्हणून जागतिक आरोग्य दिनाचे महत्त्व मोठे ठरते. आज संपूर्ण जग आरोग्यविषयक गंभीर समस्यांचा सामना करीत आहे.

आजार किंवा व्याधी टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याची नितांत गरज आहे. आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. अनेकदा आजार व व्याधींना आपणच निमंत्रण देतो. जसे की, धूम्रमान करणे, तंबाखू सेवन, दारू अथवा मादक पदार्थांचे सेवन करणे आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. हे आपल्याला माहीत असूनही आपण ही व्यसने करतो. झाडे तोडल्याने प्राणवायूची कमतरता भासते. पर्जन्यमान कमी होते. हे आपल्याला माहीत आहे. तरीही आपण झाडे तोडतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात सकस आहार, पुरेशी झोप, मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन, व्यायाम करणे, ऋतूनुसार आहाराची निवड करणे. याकडे आपले कमालीचे दुर्लक्ष होते. आपण निरोगी जीवन जगण्यासाठी नव्हे, तर केवळ जिवंत राहण्यासाठी उदरभरण करीत असतो. त्याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. धावपळीच्या आयुष्यामुळे आपल्याला शांत झोप लागत नाही. तसेच, पौष्टिक आहाराचे सेवन करण्यासाठीही आपल्याकडे वेळ नसतो.

सुदृढ शरीरात निरोगी मन वास करते, असे म्हटले जाते. मन निरोगी असेल तर आपले विचारदेखील निकोप व निरोगी राहतील. त्यामुळे आपल्याला मानसिक आजार भेडसावणार नाहीत. पौष्टिक आहारामुळे शरीर निरोगी राहील. व्यायामामुळे ताणतणाव तर दूर होईलच; शिवाय शारीरिक क्षमता वाढेल. रोगप्रतिकार शक्ती वाढून आजार आपल्या शरीरापासून दूर राहतील. तेव्हा, संतुलित आहार, पुरेशी झोप, तणावापासून दूर राहणे, मानसिक आरोग्याची काळजी आणि नियमित व्यायाम ही पंचसूत्री पाळण्याचा संकल्प आज World Health Day जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण करूया!

– 8806006149