नवी दिल्ली : भारताचा खरा इतिहास हा पराक्रमाचा आणि तो पराक्रम करणार्या योध्द्यांचा आहे. या वीरांनी अत्याचारी परकीय आक्रमकांविरोधात अभूतपूर्व शौर्य गाजविले आहे. या इतिहासाचे स्पष्ट पुरावे आहेत. मात्र, दुर्दैवाने आपल्याला स्वातंत्र्यानंतरही गुलामीचाच इतिहास शिकविण्यात आला. पूर्वीच्या सरकारांनी देशाचा खरा इतिहास जाणूनबुजून लपविला आहे. आता आम्ही तो लोकांसमोर आणण्याचे महत्वाचे कार्य हाती घेतले आहे. भारताचा इतिहास केवळ गुलामीचा इतिहास नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दिल्लीच्या विज्ञान भवनाच्या सभागृहात आसामचे महापराक्रमी योद्धे लचित बरफुकान यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारचे इतिहास शिक्षणासंबंधीचे धोरण स्पष्ट केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर विकृत आणि हेतुपुरस्सर लिहिलेला इतिहास पुसून टाकून खरा इतिहास शिकविण्याची आवश्यकता होती. पण संकुचित राजकीय उद्दिष्टये साध्य करण्यासाठी तसे करण्यात आले नाही. भारतीयांच्या पराक्रमाचा इतिहास दडविण्यात आला. आपल्या पुरातन शूरांनी धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी केलेले आत्मबलिदान भारतीयांना समजूच नये अशी व्यवस्था करण्यात आली. आमचे सरकार हे कारस्थान हाणून पाडणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
लचित बरफुकान ईशान्येचे ‘शिवाजी महाराज’
आसामचे महापराक्रमी योद्धे लचित बरफुकान यांनी परकीय आक्रमकांना आपल्या तलवारीचे पाणी पाजले होते. जर कोणी शस्त्रबळावर आम्हाला वाकवू पहात असेल किंवा आमची ओळख मिटविण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याला धडा शिकविल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे लचित बरफुकान यांनी सिद्ध केले होते. लचित बरफुकान यांना ईशान्येचे ‘शिवाजी महाराज’ म्हणून ओळखले जाते. कारण त्यांनी शिवाजी महाराजांप्रमाणेच मोंगलाना अनेकवेळा बुद्धी आणि पराक्रमाच्या जोरावर हरविले होते.