नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल या प्रश्नावर चर्चा सुरु असतांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाची चर्चा होते. या दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीएम मोदींनंतर ते पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार की नाही, यावर स्पष्ट उत्तर दिले आहे. एका खाजगी टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीबाबतही मोठी भविष्यवाणी केली.
पंतप्रधान मोदी हे देशाचे एक बलशाली नेतृत्व आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला नवी ओळख मिळाली. कोणत्याही निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांचे नाव मोठे असते. २०१४ मध्ये ते पंतप्रधान झाल्यापासून समाजातील प्रत्येक घटकाला त्यांच्या कार्यशैलीचा फायदाच झाला आहे. त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. मी कोणत्याही पदासाठीचा दावेदार नाही. मला सध्या फक्त उत्तर प्रदेशात राहण्याची इच्छा आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्पष्टपणे म्हणाले. २०२४ मध्ये भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.