Prime Minister Modi : गोदावरीतीरी पंतप्रधान नरेंद्र मोदीं नी महाआरतीनंतर केला ‘हा’ संकल्प

Prime Minister Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. रोड शो च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाशिककारांनी फुलांची उधळण केली. यानंतर रामकुंड परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी तीरावर असणाऱ्या रामकुंडावर जलपूजन केलं. गोदावरीचं जलपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जल्लोषात स्वागत झालं. जय श्रीरामच्या घोषणांनी हा परिसर दुमदुमला होता. या जलपूजनानंतर त्यांनी देशाच्या विकासासाठी संकल्प सोडला.

राम कुंडाचं धार्मिक महत्व काय?
रामकुंड हे गोदावरी नदीच्या तीरावर असलेले धार्मिक कुंड आहे. हिंदू धर्मीय हे कुंड अतिशय पवित्र कुंड मानतात. या कुंडात प्रभू श्रीरामांनी अंघोळ केली होती अशी श्रद्धा आहे. या कुंडाच्या शेजारीच सीता कुंड आणि लक्ष्मण कुंडही आहेत. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार गोदावरी नदीतील रामकुंडात अंघोळ केल्यास पापक्षालन होते.

कुंभमेळा आणि अमृताचे थेंब
समुद्र मंथनाच्या वेळी अमृत जेव्हा बाहेर आलं तेव्हा देव आणि दानव यांच्यात अमृत कलश कुणाचा? यावरुन युद्ध सुरु झालं होतं. देव आणि दानव यांच्या संघर्षात अमृत कलशातले काही थेंब पृथ्वीवर पडले. त्यातला एक थेंब नाशिकच्या राम कुंड ज्या जागी आहे तिथे पडला अशी अख्यायिका आहे. त्यामुळेच या ठिकाणी कुंभमेळाही भरवला जातो. दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचं आयोजन नाशिकमध्ये केलं जातं.

रामकुंडात अस्थी विसर्जन केल्याने मिळतो मोक्ष
हिंदू धर्मीय रामकुंडावर एक नियोजित केलेली जागा आहे तिथे अस्थी विसर्जनासाठी येतात. या अस्थी विरघळून जाता आणि मृतात्म्यास मोक्ष मिळतो असा समज हिंदू धर्मीयांमध्ये आहे. आज याच ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या राम कुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलं. तसंच यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शनही घेतलं.