Prime Minister Modi : नाशिकच्या रोड शोमध्ये मोदींच्या कारला ‘ट्रिपल इंजिन’

Prime Minister Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आगमन झाले. काहीवेळापूर्वीच पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये पोहोचले. त्यानंतर निलगिरी बाग ते रामकुंडापर्यंत पंतप्रधान मोदी यांनी रोड शो केला. एरवी रोड शो किंवा अन्य कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे एकटेच केंद्रस्थानी असतात. मात्र, नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या या रोड शो वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ओपन जीपमध्ये राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारचे आधारस्तंभ असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी आणि शिंदे-फडणवीस-पवार ही त्रिमूर्ती असे चित्र रोड शो वेळी पाहायला मिळाले. राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना तिन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जातील, असा राजकीय संदेश या माध्यमातून देण्यात आल्याची चर्चा आहे. या वाहनात मोदींच्या एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, पाठीमागच्या बाजूला अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उभे होते.

यावरुन अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अनेकदा अजित पवार हे भाजपसोबतच्या कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याची चर्चा होते. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात अजित पवार हे आवर्जून उपस्थित होते.

तत्पूर्वी नाशिकमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन प्रधानमंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते.

 

तत्पूर्वी मोदींनी रामकुंडाच्या परिसरात प्रतिकात्मक गोदास्नान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो साठी तपोवन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.