आणीबाणीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले…

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील देशाच्या १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात सर्व खासदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे, ज्यामध्ये प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब सर्व खासदारांना शपथ देतील. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवास साधत आणीबाणीच्या निमित्ताने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील जनतेला विरोधकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. विरोधक लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील आणि जनतेचे प्रश्न मांडतील, असा आम्हाला विश्वास आहे. उद्या २५ जून आहे. भारतीय संविधान आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी २५ जून हा दिवस अविस्मरणीय आहे. या दिवशी भारताच्या लोकशाहीला काळीमा फासला गेला आणि त्याला ५० वर्षे पूर्ण करत आहे.

त्यावेळी भारताची राज्यघटना पूर्णपणे नाकारली गेली हे भारताची नवीन पिढी विसरणार नाही. लोकशाही पूर्णपणे दडपली गेली आणि देशच तुरुंगात बदलला. ५० वर्षांपूर्वी जे केले होते ते भारतात पुन्हा कोणी करण्याची हिम्मत करू नये असा संकल्प आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, २७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. यानंतर २८ जूनपासून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू होईल. त्याचवेळी पंतप्रधान २ किंवा २ जुलै रोजी चर्चेला उत्तर देतील. २४ जून ते ३ जुलै या कालावधीत हे अधिवेशन सुरू होणार असून या १० दिवसांत एकूण ८ बैठका होणार आहेत.