जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले पंतप्रधान मोदी ; दिग्गजांना मागे टाकलं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. ताज्या सर्वेक्षणात ७६ टक्के रेटिंगसह मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांसारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. ग्लोबल डिसिजन इंटेलिजेन्स फर्म मॉर्निंग कंसल्टनं केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

मोदी सरकारमधील मंत्री पियूष गोयल यांनी एका ट्विटच्या माध्यमातून या सर्व्हेची माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी आताही जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत, असं पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मॉर्निंग कंसल्टकडून त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार मोदी यांना ७६ टक्के रेटिंग मिळाली आहे. दुसर्‍या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती लोपेज ओब्राडोर आहे. ज्यांची रेटिंग ६१ टक्के इतकी आहे. सर्वेक्षणादरम्यान प्रत्येक देशातील वय, लिंग, प्रदेश यातील विविधतेचीही काळजी घेण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांना ४१ टक्के रेटिंगसह सातवं स्थान मिळालं आहे. झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पेट्र फियाला, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सेओक येओल हे शेवटच्या तीन स्थानांवर आले आहेत. या सर्वेक्षणात कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांना ९ वं स्थान मिळालं आहे. याशिवाय जपानचे पीएम फुमियो किशिदा हे १७ व्या स्थानावर आहेत. २२ नेत्यांच्या यादीत १९ टक्के रेटिंगसह द.कोरियाचे राष्ट्रपती यून सुक यिओल शेवटच्या स्थानावर आहेत.