पंतप्रधान मोदींनी असा साजरा केला रक्षाबंधनाचा सण; पाहा व्हिडिओ

मुंबई : आज देशभरात उत्साहाने रक्षाबंधनाचा सण साजरा होतो आहे. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते. बहीण-भावाच्या गोड नात्याचा हा सण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही साजरा केला. पंतप्रधानांना शाळकरी मुलींनी आज राख्या बांधल्या. दिल्लीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगाचा व्हिडिओ समोर आला आहे.

भद्र काळात राखी बांधावी का?

यंदाच्या रक्षाबंधनाला भद्र काळ येत आहे. भद्र काळ हा शुभ गोष्टी करण्यासाठी योग्य मानला जात नाही. त्यामुळे भद्रकालात राखी बांधावी का? असा प्रश्न बहिणींना पडला आहे. शास्त्रानुसार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांपासून ते रात्री ९ वाजून ०२ मिनिटांपर्यंत भद्रा करण आहे. परंतू, महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे ३० ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल. भद्राकालात राखी बांधली तर वाईट होईल, असे जे म्हटले जाते, त्यात काहीही तथ्य नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे आणि गुरुवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी श्रावण पौर्णिमा समाप्त होत आहे. शास्त्रनियमाप्रमाणे बुधवारी ३० ऑगस्ट रोजीच रक्षाबंधन सण साजरा करायचा आहे. शास्त्रनियम असा आहे की, सूर्योदयापासून ६ घटिकांपेक्षा जास्त व्यापिनी अशा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अपरान्हकाली किंवा प्रदोषकाली रक्षाबंधन करावयाचे आहे. तशी स्थिती बुधवारी ३० ऑगस्ट रोजी आहे . म्हणून सर्वांनी बुधवार ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा करावा, असे सांगितले जाते.