पंतप्रधान मोदींनी विरोधकांना एक कविता आणि गाण्याने डिचवलं; वाचा काय म्हणाले…

नवी दिल्ली : एकीकडे दिल्लीत एनडीएच्या सर्व घटकपक्षांची बैठक होत आहे तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये भाजपविरोधी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आदी वजनदार नेतेमंडळी उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पोर्ट ब्लेअरच्या नव्या वीर सावरकर विमानतळाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.

भारत आत्तापर्यंत कुठून कुठपर्यंत पोहोचू शकला असता. भारतीयांच्या सामर्थ्यात कोणतीच कमी नव्हती. पण सामान्य भारतीयाच्या या सामर्थ्यावर नेहमीच भ्रष्टाचारी आणि परिवारवादी पक्षांनी अन्याय केला आहे. भारताच्या दुरवस्थेला जबाबदार काही लोक आपलं दुकान उघडून बसले आहेत. त्यांना पाहून मला एका कवितेच्या काही ओळी आठवतात. अवधी भाषेतली ही कविता आहे. गाईत कुछ है, हाल कुछ है, लेबिल कुछ है, माल कुछ है.. २४ साठी २६ होणाऱ्या राजकीय पक्षांवर ही कविता तंतोतंत लागू होते. म्हणजे गाणं कुठलं वेगळंच चाललंय पण सत्य वेगळंच आहे. लेबल कुणा भलत्याचंच लावलं गेलंय, पण उत्पादन वेगळंच काहीतरी आहे. यांच्या दुकानाचं हेच सत्य आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

यांच्या दुकानावर दोन वस्तूंची गॅरंटी मिळते. एक म्हणजे ते आपल्या दुकानावर जातीवादाचं विष विकतात. दुसरं ते अमर्याद भ्रष्टाचार करतात. आज हे लोक बंगळुरूत एकत्र आले आहेत. एकेकाळी एक गाणं प्रसिद्ध होतं. ‘एक चेहरेपर कई चेहरे लगा लेते है लोग’. हे लोक किती चेहरे लावून बसले आहेत ते बघा. कॅमेऱ्यासमोर जेव्हा हे लोक एका फ्रेममध्ये येतात, तेव्हा लोकांना लाखो, कोट्यवधींचा भ्रष्टाचार दिसतो. हे कट्टर भ्रष्टाचारी संमेलन होत आहे”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

या बैठकीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. जर कुणी कोट्यवधींच्या घोटाळाप्रकरणी जामिनावर असेल, तर त्याच्याकडे सन्मानाने पाहिलं जातं. संपूर्ण कुटुंबच जामिनावर असेल, तर त्याचा आणखीन पाहुणचार होतो. भ्रष्टाचार प्रकरणी एखादा मंत्री तुरुंगात गेला, तर त्याला अतिरिक्त गुण देऊन विशेष आमंत्रित म्हणून बोलवलं जातं. भ्रष्टाचाराबद्दल यांच्यात फार प्रेम आहे. त्यामुळे २० लाख कोटींच्या भ्रष्टाचाराची गॅरंटी देणारे हे लोक एकत्र आले आहेत, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी लगावला आहे.