नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यात विजय मिळाला. तीनही राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीसाठी मोठ्या नेत्यांची फळी असतानाही भाजपाने नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही पदे देऊ केली. भाजपाच्या या राजकीय खेळीने अनेकांना आश्चर्यचकित केले असले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा मतप्रदर्शन केले आहे.
तीन राज्यात सत्ता स्थापन करत असताना भाजपाने राजस्थान येथे पहिल्यांदाच निवडून आलेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यंमत्रीपदाची जबाबदारी दिली. तर मध्य प्रदेशमध्ये मोहन यादव आणि छत्तीसगडमध्ये विष्णू देव साय यांना संधी दिली. भाजपाच्या या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य वाटले होते. इंडिया टुडेकडून पंतप्रधान मोदी यांना ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ हा सन्मान देण्यात आला यावेळी घेतलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रश्नांवर भूमिका मांडली मांडली.
मोदी म्हणाले की, “नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत सांगायचे झाल्यास माझेच सर्वात मोठे उदाहरण आहे. मी जेव्हा गुजरातचा मुख्यंमत्री झालो होतो, तेव्हा मलाही प्रशासनाचा कोणताच अनुभव नव्हता. तसेच त्याआधी मी विधानसभेतही निवडून आलो नव्हतो.”
२००१ साली तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर चार महिन्यांनी ते विधानसभेवर निवडून गेले होते. “भाजपा कार्यकर्त्यांवर आधारित पक्ष आहे. त्यामुळे पक्षाकडून अशाप्रकारचे विविध प्रयोग केले जात असतात”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.