तरुण भारत लाईव्ह । २२ मे २०२३। लोकप्रियतेच्या बाबतीत जगात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अव्वल आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासह 22 देशांच्या राष्ट्रप्रमुखांना त्यांनी मागे टाकले आहे. अमेरिकेतील मॉर्निंग कन्सल्टने 22 देशांमध्ये हे सर्वेक्षण केले आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान मोदी पुन्हा आघाडीवर आहेत. फर्मने हा दावा आपल्या मान्यता रेटिंगच्या आधारे केला आहे.
सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रियेच्या बाबतीत अव्वल असून त्यांचे रेटिंग 78 टक्के आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर स्विस राष्ट्राध्यक्ष अलेन बेर्सेट, मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानीज यांचा क्रमांक लागतो. अमेरिकन फर्म मॉर्निंग कन्सल्टने जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेबाबत हे सर्वेक्षण केले होते. यामध्ये 22 देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा समावेश असून 22 देशांमध्ये हा सर्वे करण्यात आला आहे. सध्या जपानमध्ये जी-7 शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेत यावेळी लोकप्रिय नसलेल्या नेत्यांची सं‘या अधिक असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र, नरेंद्र मोदी हे लोकप्रियतेच्या बाबतीत पहिल्या क‘मांकावर आहेत, असे सांगण्यात आले आहे.
मॉर्निंग कन्सल्टने सर्वेक्षणात 22 देशांचा समावेश केला आहे. यामध्ये अमेरिका, फ्रान्स, जपान, ब्रिटन, भारत, स्वित्झर्लंड, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, इटली, कॅनडा, जर्मनी या राष्ट्रांचा समावेश आहे. सर्वेक्षणात केलेल्या दाव्यानुसार अनेक नेत्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. इतकेच नव्हे काही नेत्यांची लोकप्रियता कमी झाली आहे. त्यांना आज निवडणुका झाल्या तर पराभवाला सामोरे जावे लागू शकते. यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांच्या पक्षाचा समावेश आहे. याशिवाय जर्मन चान्सलर स्कोल्झ यांचा पक्षही निवडणुकीत पराभूत होऊ शकतो, असाही दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
लोकप्रियतेच्या बाबतीत अव्वलस्थान मिळवणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधीही पहिल्या क्रमांकावर होते. याआधी मार्चमध्येदेखील हा सर्वे करण्यात आला होता. त्यावेळी देखील मोदीच प्रथम क्रमांकावर होते. मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्टमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर होते. 22 देशांच्या नेत्यांना पराभूत करून त्यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत पहिले स्थान मिळवले होते. त्यावेळी सर्वेक्षणात पीएम मोदींचे रेटिंग 76 टक्के होते.