नव्या संसदेत भाषण करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले…

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाषण करत आहे. ७५ वर्षांचा संसदीय प्रवास पुन्हा एकदा लक्षात ठेवण्याची आणि नव्या सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी ते प्रेरणादायी क्षण आणि इतिहासातील महत्त्वाचे क्षण आठवून पुढे जाण्याची ही संधी आहे. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर या इमारतीला संसद भवन म्हणून मान्यता मिळाली. ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता. या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशवासीयांचा घाम आणि कष्ट आहे, हे आपण अभिमानाने सांगू शकतो, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. जुन्या संसद इमारतीचं संग्रहालय करण्यात येणार आहे. संसदेचा इतिहास सामान्य जनतेला सदैव पाहता येणार आहे. नव्या संसद इमारतीत जाण्याची प्रक्रिया भावनिक असल्याचं सांगत नरेंद्र मोदी भाषण करताना भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सूचक वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. संसदेचे हे विशेष अधिवेशन छोटं असले तरी खूप महत्वाचे आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन आहे. अधिवेशन छोटं आहे. त्यामुळे विरोधकांनी सहकार्य करावं. रडगाणं गाण्यासाठी नंतर बराच वेळ आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी विरोधकांवर केली. २०४७ पर्यंत देशाला विकसित देश बनवायचे आहे. त्यासाठी येणाऱ्या काळातील सर्व निर्णय नवीन संसद भवनात घेतले जातील, असं सूचक वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसेच चंद्रावर मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकतोय. तसेच जी-२० परिषद यशस्वीरित्या पार पडली. भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनला असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितले.

७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर होणार चर्चा

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज ७५ वर्षांचा संसदीय प्रवास, उपलब्धी, अनुभव, आठवणीवर राज्यसभेत चर्चा होणार आहे. स्वातंत्र्यानंतर काय साध्य झाले, यावर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर आठ विधेयके मांडली जातील. विशेष अधिवेशनाच्या पाचही दिवशी सर्व कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना सभागृहाच्या संपूर्ण कामकाजात उपस्थित राहण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.