नवी दिल्ली : ‘वसुधैव कुटुंबकम्’- या दोन शब्दांमध्ये सखोल तत्वज्ञान सामावलेले आहे. याचा अर्थ आहे ‘ हे जग म्हणजे एक कुटुंब आहे.’ हा एक सर्वसमावेशक विचार आहे जो आपल्याला सीमा, भाषा आणि विचारसरणी यांच्या पलीकडे जाऊन एक सार्वत्रिक कुटुंब म्हणून प्रगती करण्यासाठी प्रेरित करतो. भारताच्या जी 20 अध्यक्षतेच्या काळात याचे रुपांतर मानवकेंद्री विकासाच्या आवाहनात झाले आहे. एक पृथ्वी म्हणून आपण सर्व आपल्या ग्रहाचे संवर्धन करण्यासाठी एकत्र येत आहोत. एक कुटुंब म्हणून आपण परस्परांना विकासासाठी पाठबळ देत आहोत. आणि आपण सर्व एका सामाईक भवितव्याच्या दिशेने- एका भविष्याच्या दिशेने एकत्र वाटचाल करत आहोत; जे या परस्पर-संलग्नतेच्या काळात एक सर्वमान्य सत्य आहे.
महामारी पश्चात जग
महामारी पश्चात जगामधील देशांची स्थिती महामारीपूर्व काळापेक्षा खूपच वेगळी आहे. यामध्ये इतर बदलांबरोबरच तीन महत्त्वाचे बदल झाले आहेत. सर्वात पहिला बदल म्हणजे आता जगाच्या जीडीपी- केंद्रित दृष्टीकोनापेक्षा मानव-केंद्रित दृष्टीकोनाकडे वळण्याची गरज असल्याची भावना वाढीला लागत आहे.दुसरा बदल म्हणजे जागतिक पुरवठा साखळीच्या चिवटपणाचे आणि विश्वासार्हतेचे महत्त्व जगाला पटू लागले आहे. तिसरा बदल म्हणजे, जागतिक संस्थांमध्ये सुधारणांच्या माध्यमातून बहुपक्षवादाला चालना देण्याचा सामूहिक सूर व्यक्त होऊ लागला आहे. या सर्व बदलांमध्ये आमच्या जी २० अध्यक्षतेने एका उत्प्रेरकाची भूमिका बजावली आहे.
मानसिकतेमधील बदलाला जी20 ने चालना देण्याची गरज
डिसेंबर 2022 मध्ये ज्यावेळी आम्ही इंडोनेशियाकडून अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली, तेव्हा मी लिहिले होते की मानसिकतेमधील बदलाला जी20 ने चालना देण्याची गरज आहे. ग्लोबल साऊथ आणि आफ्रिकेतील विकसनशील देशांच्या आकांक्षांना मुख्य प्रवाहात आणण्या संदर्भात याची विशेषत्वाने गरज होती. 125 देशांचा सहभाग असलेल्या ग्लोबल साऊथ शिखर परिषदेमधून घुमलेला आवाज, हा आमच्या जी20 अध्यक्षतेखालील उपक्रमांमधील एक महत्त्वाचा उपक्रम होता. ग्लोबल साऊथ देशांचे अभिप्राय आणि त्यांच्या संकल्पना, त्यांचे विचार जाणून घेण्याच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम होता.
आफ्रिकी देशांकडून सर्वाधिक सहभाग
भारताच्या अध्यक्षतेच्या कालावधीत जी-20 मध्ये आफ्रिकी देशांकडून आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग नोंदवला गेला, एवढेच नव्हे तर आफ्रिकी संघातील देशांचा जी-20 चे स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्याची मागणी देखील अधिक ठामपणे मांडण्यात आली. एकमेकांशी जोडले गेलेले आपले जग म्हणजे विविध क्षेत्रांतील आपली आव्हाने देखील एकमेकांशी जोडलेली असणे आहे.वर्ष 2030 साठीच्या कार्यक्रमपत्रिकेतील उद्दिष्टांचा अर्धा प्रवास पूर्ण करण्याचे हे वर्ष आहे आणि अनेकांना अशी चिंता सतावते आहे की शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (एसडीजी) प्रगतीचा मार्ग काहीसा भरकटला आहे. एसडीजी साध्य करण्याच्या प्रगतीला अधिक वेग देण्यासाठीची जी-20 2023 कृती योजना यापुढील काळात एसडीजीच्या अंमलबजावणीच्या दिशेने जी-20 ची दिशा निश्चित करेल.
हवामान बदल विषयक कृतीमधील योगदान
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काय करायला नको याबाबतीतील निव्वळ निर्बंधात्मक वृत्तीपासून दूर जाऊन, काय केले पाहिजे त्यावर लक्ष केंद्रित करुन अधिक रचनात्मक वृत्ती स्वीकारण्याची गरज आहे यावर आमचा विश्वास आहे. शाश्वत तसेच लवचिक नील अर्थव्यवस्थेसाठी चेन्नई एचएलपीएस मध्ये आपले महासागर अधिक निरोगी राखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या अध्यक्षतेतून हरित हायड्रोजन नवोन्मेष केंद्रासह, स्वच्छ आणि हरित हायड्रोजनसाठीची जागतिक परिसंस्था उदयाला येईल. वर्ष 2015 मध्ये आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन केली. आता, जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून आपण चक्राकार अर्थव्यवस्थेच्या फायद्याशी सुसंगत असणारे उर्जा स्थित्यंतर शक्य होण्यासाठी जगाला मदत करत आहोत.
हवामान बदल विषयक कृतीचे लोकशाहीकरण करणे हा चळवळीला गती देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्याप्रमाणे व्यक्ती आपल्या दीर्घकालीन आरोग्याचा विचार करून दैनंदिन निर्णय घेतात, त्याचप्रमाणे ग्रहाच्या दीर्घकालीन आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून ते जीवनशैलीचे निर्णय घेऊ शकतात. ज्याप्रमाणे निरामयतेसाठी योग एक जागतिक लोकचळवळ झाली आहे, त्याचप्रमाणे आपण शाश्वत पर्यावरणासाठी जीवनशैली (LiFE) ने जगाला प्रेरित केले आहे. हवामान बदलाच्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर, अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वपूर्ण ठरते. मिलेट्स अर्थात भरडधान्ये किंवा श्री अन्न , क्लायमेट -स्मार्ट शेतीला चालना देत यासाठी साहाय्यकारी ठरू शकतात. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षात, भरडधान्यांना आपण जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. अन्न सुरक्षा आणि पोषण विषयक आव्हानांवर कृती सांगणारी ‘डेक्कन हाय लेव्हल प्रिन्सिपल्स ऑन फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन’ ही तत्त्वेदेखील या दिशेने उपयुक्त आहेत.
तांत्रिक प्रगतीचे फायदे समाजातील सर्व घटकांना
तंत्रज्ञान परिवर्तनकारी आहे पण ते सर्वसमावेशक बनवायला हवे. भूतकाळात, तांत्रिक प्रगतीचे फायदे समाजातील सर्व घटकांना समान रीतीने लाभले नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर विषमता रुंदावण्याऐवजी त्या कमी करण्यासाठी कसा उपयोग केला जाऊ शकतो, हे भारताने गेल्या काही वर्षांमध्ये दाखवून दिले आहे उदाहरणार्थ, जगभरातील अब्जावधी लोक जे बँक सेवेपासून वंचित राहतात किंवा ज्यांना डिजिटल ओळख नसते, अशा लोकांसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधेद्वारे (DPI) वित्तीय समावेशन करणे शक्य आहे. आपण आपल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून तयार केलेल्या उपायांची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. आता, जी 20 च्या माध्यमातून आम्ही विकसनशील देशांना सर्वसमावेशक विकासाची शक्ती जागृत करण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी अनुकूलनशीलता, निर्माण आणि उंचावण्यात साहाय्य करू
भारत सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था
भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, हा योगायोग नाही. आपल्या साध्या, मोठा आवाका असलेल्या आणि शाश्वत उपायांनी समाजाच्या असुरक्षित आणि उपेक्षित घटकाला आपली विकासाची गाथा पुढे नेण्यासाठी सक्षम केले आहे. अवकाश क्षेत्रापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत, अर्थव्यवस्थेपासून ते उद्योजकतेपर्यंत, भारतीय महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यांनी महिलांचा विकास, या संकल्पनेला महिलांच्या नेतृत्वाखालील विकासामध्ये परिवर्तीत केले आहे. भारताच्या जी20 अध्यक्षपदा अंतर्गत आपण लिंग आधारित डिजिटल तफावत दूर करण्याचा, कामगारांच्या सहभागामधील तफावत कमी करण्याचा आणि महिलांचा नेतृव आणि निर्णय प्रक्रियेमधील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत.
भारतासाठी, जी20 अध्यक्षपद हा केवळ उच्चस्तरीय राजनैतिक कार्यक्रम नाही. लोकशाहीची जननी आणि विविधतेचे मॉडेल म्हणून आम्ही या अनुभवाची कवाडे जगासाठी खुली केली आहेत. आज, मोठ्या प्रमाणावर उद्दिष्टे पूर्ण करणे हा एक गुण समजला जातो, आणि तो भारताशी संबंधित आहे. जी20 चे अध्यक्षपद, यासाठी अपवाद नाही. ही एक लोक-नेतृत्वाखालील चळवळ बनली आहे. भारताच्या विशाल भूभागावर, 60 शहरांमध्ये 200 पेक्षा जास्त बैठका आयोजित करण्यात आल्या असून, आपल्या कार्यकाळात 125 पेक्षा जास्त देशांच्या जवळजवळ 100,000 प्रतिनिधींनी या बैठकींना हजेरी लावली. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या जी 20 अध्यक्षपदा अंतर्गत एवढा विशाल आणि वैविध्यपूर्ण भूभाग व्यापला गेला नाही.
भारताची लोकसंख्या, लोकशाही, विविधता आणि विकास याविषयी दुसऱ्याकडून ऐकणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हे पूर्णपणे वेगळे आहे. मला खात्री आहे की जी 20 परिषदेत सहभागी व्हायला आलेले प्रतिनिधी याला नक्की दुजोरा देतील. आपले जी 20 अध्यक्षपद एकमेकांना जोडण्याचा, अडथळे दूर करण्याचा, आणि जगाचे पोषण करणाऱ्या सहकार्याची बीजे रोवण्याचा प्रयत्न करते, जिथे एकता विसंवादावर विजय मिळवते, जिथे सामायिक नियती एकाकीपण दूर करते. जी 20 चे अध्यक्ष या नात्याने आपण प्रत्येक आवाज ऐकला जाईल आणि प्रत्येक देशाचे योगदान राहील, याची खात्री करून जागतिक अवकाश विस्तारण्याची प्रतिज्ञा केली. आपण आपल्या प्रतिज्ञेला कृती आणि परिणामांची जोड दिली, याबद्दल मी आशावादी आहे.