नवी दिल्ली: सर्व देशवासीयांचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर संपूर्ण देशात आनंदाची लहर आली आहे. चंद्रयान-३च्या उड्डाणानंतर देशभरातून अनेक राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, नागरिक शुभेच्छा देत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत इस्त्रोला शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रयान-३ मिशनसाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हे उल्लेखनीय मिशन आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्नांना पुढे नेईल, असा विश्वासही नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.
३,००,००० किमी पेक्षा जास्त अंतर कापून ते येत्या काही आठवड्यात चंद्रावर पोहोचेल. या यानातील वैज्ञानिक उपकरणं चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतील चांद्रयान-२ हे तितकेच पथदर्शक होते कारण त्याच्याशी संबंधित ऑर्बिटरच्या डेटानं रिमोट सेन्सिंगद्वारे प्रथमच क्रोमियम, मॅगेनीज आणि सोडियम असल्याचं शोधून काढलं. हे चंद्राच्या चुंबकीय उत्क्रांतीबद्दल अधिक माहिती देखील देतं, असंही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.