6G तंत्रज्ञानाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं विधान; वाचा काय म्हणाले….

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये आजपासून इंडिया मोबाईल काँग्रेसला सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदींनी राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे ७ व्या भारतीय मोबाईल काँग्रेस २०२३ चे उद्घाटन केले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील 100 5G प्रयोगशाळांचं देखील उद्घाटन केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की “टेक्नोलॉजीमध्ये आज दररोज वेगाने बदल होत आहे. त्यामुळेच आपण म्हणतो – दि फ्युचर इज हिअर अँड नाऊ! मी याठिकाणी असलेल्या स्टॉल्समध्ये याच भविष्याची झलक पाहिली. टेलिकॉम, टेक्नॉलॉजी, कनेक्टिव्हिटी, एआय, सायबर सिक्युरिटी, सेमिकंडक्टर, 6G, ड्रोन, डीप सी किंवा स्पेस, ग्रीन टेक किंवा अन्य कोणतेही सेक्टर्स असो.. येणारा काळ हा अगदी वेगळाच असणार आहे.”

भारतीय मोबाईल काँग्रेस हा आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, मीडिया आणि औद्योगिक विकास मंच आहे. दिल्लीतील प्रगती मैदानजवळी भारत मंडपम सभागृहात २७ ते २९ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. दूरसंचार आणि औद्योगिक क्षेत्रातील भारताच्या अविश्वसनीय प्रगतीला जगासमोर ठेवण्याचं काम या तीन दिवसांत होत आहे. आयएमसी २०२३ मध्ये जवळपास २२ देशांतील १ लाखांपेक्षा अधिक उद्योग जगतातील मान्यवर सहभाग घेणार आहेत. त्यामध्ये, जवळपास ५००० सीईओ दर्जाचे प्रतिनिधी, २३० सादरकर्ते आणि ४०० स्टार्टअप व इतरही हितधारक सहभागी आहेत.

6G मध्ये लीडर होणार भारत

पंतप्रधान पुढे म्हणाले, की भारतात वेगाने 5G चा विस्तार होत आहे. एवढंच नाही, तर 6G क्षेत्रातही आपण लीडर होण्याच्या दृष्टीने पुढे जात आहोत. आमच्या सरकारच्या काळात 4G चा विस्तार झाला, मात्र आमच्यावर एकही डाग लागला नाही. 6G क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल असा मला विश्वास आहे.”आपण जेव्हा भविष्यावर बोलत असतो, तेव्हा पुढील दशक किंवा शताब्दीबद्दल भाष्य करतो. मात्र, टेक्नॉलॉजी विकासाच्या माध्यमातून आता ह्या गोष्टी काही दिवसांतच पूर्ण होतात. येणारा काळ निश्चितच वेगळा आहे, देशाची भावी पिढी देशाच्या टेक इंडस्ट्रीचं नेतृत्त्व करत आहे. जगभरातील देशांच्या तुलनेत भारतात ५ जी टेक्नॉलॉजीचा विस्तार गतीने होत आहे. तरीही आपण थांबलो नाहीत. याउलट ६जी च्या क्षेत्रातही जगाचं नेतृत्व करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे, असे मोदींनी म्हटले.