पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं

पुणे : महारष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत कौतुक केलं. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारताना मला आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्यांचं स्वागत पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि भेट देऊन करण्यात आलं. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधत कार्यक्रमात अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. मोदी म्हणाले, हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे. एखादा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा जबाबादारी देखील वाढते. हा पुरस्कार मी 140 कोटी देशवासीयांना समर्पीत करतो, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खास या पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आल्यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. तिथे अभिषेकही केला. तसेच पुरस्कार प्रदान केल्यानंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आणि दगडूशेठ यांचा उल्लेख केला. मोदींनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आज लोकशाहीर आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने त्यांनाही पंतप्रधानांनी अभिवादन केलं.

शरद पवारांनी थोपटली मोदींची पाठ

पंतप्रधान मोदींनी पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर येतात मान्यवरांना हात जोडून नमस्कार केला. मात्र, यावेळी, मोदींनी शरद पवारांसमोर येताच त्यांच्या हातात हात दिला. शरद पवारांनीही स्मीतहास्य करत मोदींची पाठ थोपटली. आज पुण्यातील या पुरस्कार सोहळ्यात मोदींसमवेत व्यासपीठावर एकत्र आल्याने विरोधी पक्षाच्या राजकीय वर्तुळात आणि इंडिया आघाडीतही काहीशी नाराजी असल्याची चर्चा होती. शिवसेनेच्या संजय राऊत यांनीही उघडपणे ही नाराजी बोलून दाखवली होती. आता, कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदी-पवार यांची व्यासपीठावर भेट झाली. या भेटीवेळी मोदी आणि शरद पवार यांच्यात अल्पसा पण मजेशीर संवाद झाल्याचं दिसून आलं. कारण, मोदींनी काहीतरी बोलल्यानंतर शरद पवारांनी हसून दाद दिली. तसेच, मोदींचा हात हातात घेत त्यांची पाठही थोपटली.