मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तर मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पध्दतीने भूमीपूजन आणि लोकार्पण पार पडेल. त्यानंतर पंतप्रधानांची सभाही होणार आहे. यावेळी पंतप्रधान मेट्रो मार्गाने काही अंतर प्रवासही करणार आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमांसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिका यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
नरेंद्र मोदी यांची सभा बीकेसी मैदानात होणार आहे. या सभेसाठी भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. या स्टेजच्या खाली ’निर्धार सरकारचा कायापालट मुंबईचा’ असा स्लोगन लिहण्यात आला आहे. तसेच, भव्य रांगोळी सुद्धा काढण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत ३८ हजार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. तसेच, यावेळी १ लाखांहून अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्जही वितरित होणार आहे. दरम्यान, मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज दुपारी ४ वाजता मोदी यांची सभा पार पडणार आहे. भाजप आणि शिंदे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जबरदस्त तयारी केली आहे. याशिवाय, मुंबईत अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनिमित्त मुंबईत प्रचंड पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईत साडेचार हजार पोलिस तैनात असतील. तर भाजपचे स्वयंसेवकही तैनात राहणार आहेत. तसेच, या सभेला दीड लाख लोक येण्याचा अंदाज वर्तविण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदींचा आजचा मुंबई दौराचा कार्यक्रम
दुपारी ४.४० : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आगमनप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ.
सायं. ५ : मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण/भूमिपूजन/लाभ वितरण व सभा, बीकेसी, मुंबई.
सायं. ६.३० : मुंबई मेट्रो मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण, गुंदवली मेट्रो स्टेशन, अंधेरी, मुंबई.
सायं. ७.२० : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयाणप्रसंगी उपस्थिती, मुंबई विमानतळ.
रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ
– ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या उपक्रमामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होईल.
– या कामांसाठी अंदाजे ६,०७९ कोटी इतका खर्च येईल. पुढील २४ महिन्यांत हे काम पूर्ण होईल. या कामांतर्गत शहर भागात ७२ किमी.
– लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. पूर्व उपनगरात ७१ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत, तर पश्चिम उपनगरात २५४ किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
– यांनुसार तीनही क्षेत्रात एकूण ३९७ किमी. लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत.
या प्रकल्पांचे भूमिपूजन
– १७ हजार १८२ कोटींचे ७ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प- पालिकेच्या तीन रुग्णालयांचे १ हजार १०८ कोटींचे बांधकाम.
– ६,०७९ कोटी रुपयांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील १ हजार ८१३ कोटींच्या पुनर्विकासाचे काम.
या प्रकल्पांचे होणार लोकार्पण
– मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो मार्गिका २ अ म्हणजेच दहिसर पूर्व – डी. एन. नगर या ६ हजार ४१० कोटींच्या प्रकल्पासह मेट्रो मार्ग ७ म्हणजे अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व हा ६ हजार २०८ कोटींचा मेट्रो प्रकल्प.
– पालिकेचे २० नवीन आपले दवाखाने.
संजय राऊतांचा भाजपावर निशाणा
अनेक प्रकल्पाची योजना पायाभरणी सुरुवात अनेक अडथळे पार करून शिवसेनेची सत्ता असताना महानगरपालिकेने केलेली आहे आणि त्यातील प्रमुख कामांचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, हे शिवसेनेचे यश आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, नरेंद्र मोदींच्या मुंबई दौर्याला आमचा विरोध नसून राजकारण केल्यास बघू, असे संजय राऊत यांनी सांगितले. याशिवाय, बेळगावमधील मराठी बांधवांवरती अत्याचार करू नका, अशी सूचना देऊन त्याबाबत महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांनी घोषणा करावी, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.