---Advertisement---
जळगाव : रावेरच्या खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व कनिष्ठ लिपिक यांना ३६ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनाजी नाना विद्यालयात कार्यरत महिला शिक्षिकेची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी ३६ हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जनता शिक्षण मंडळ संचलित खिरोद्यातील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पीतांबर महाजन (५७, रा. चिनावल रोड, खिरोदा) तसेच कनिष्ठ लिपिक आरोपी आशिष यशवंत पाटील (२७, रा. उदळी, ता. रावेर) यांना धुळे ‘एसीबी’ने अटक केली.
सोमवारी, ७ रोजी सायंकाळी झालेल्या या कारवाईने शैक्षणिक वर्तुळातील लाचखोर हादरले आहे. या प्रकरणातील ६१ वर्षीय तक्रारदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम बोरोले हे असून, ते याच संस्थेतून सेवानिवृत्त झाले आहेत तर त्यांच्या स्नुषा या याच शाळेत उपशिक्षिका आहेत.
प्रसूती रजेसाठी सहा महिन्याचे मागितले पैसे
प्रसूती रजा मिळण्यासाठी महिला उपशिक्षिकेने २ जून रोजी मुख्याध्यापिका यांच्याकडे अर्ज दिला. तक्रारदाराने सुनेच्या सांगण्यावरून महिला मुख्याध्यापिकेची भेट घेतल्यानंतर प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी प्रतिमहिनाप्रमाणे सहा महिन्यांचे पैसे मागण्यात आले. याबाबत ७ रोजी तक्रार दिल्यानंतर कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारताच मुख्याध्यापिकेलाही अटक करण्यात आली. दोघा आरोपींविरोधात सावदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले होते. धुळे ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, हवालदार राजन कदम, हवालदार मुकेश अहिरे, हवालदार पावरा, कॉन्स्टेबल रामदास बारेला, चालक मोरे, बडगुजर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.