जळगाव : पत्नीचे मेडीकल बिल मंजूर करण्यासाठी महाविद्यालयातील शिपायाकडून तीन हजार ६०० रुपयांची लाच घेताना निपाणे येथील मुख्याध्यापकास दुसऱ्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील श्री संत हरिहर माध्यमिक महाविद्यालयात तक्रारदार हे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पत्नीचे मेडीकल बिलाचे २३ हजार ८१५ रुपये मंजुरीसाठी मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन यांचेकडे अर्ज केला होता. हे मेडीकल बिल स्वतःचे वैयक्तिक ओळखीने सिव्हिल हॉस्पिटल जळगाव व वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर करून मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक संदीप महाजन यांनी तक्रारदार शिपायाकडे पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार ६०० रुपये देण्याचे ठरले. याबाबत शिपाई यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
यापूर्वीही १० हजारांची घेतली होती लाच
मुख्याध्यापक संदीप महाजन यांनी या अगोदर तक्रारदार शिपाई यांचेकडून वेतन निश्चितीच्या फरकाचे दोन लाख ५३ हजार ७८० रुपये फरकाचे ५ टक्केप्रमाणे १२ हजार ५०० रुपयांची मागणी करून तक्रारदार याचेकडून १० हजार रुपये लाच स्वीकारली होती. याप्रकरणी देखील मुख्याध्यापक संदीप महाजन यांचेविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशनला गुरं. नं. १०५/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ प्रमाणे २७ जून २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यांनी केली कारवाई ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक फौजदार सुरेश पाटील, चालक पो. हे. कॉ. किशोर महाजन, पो. ना. बाळू मराठे, पो. कॉ. प्रदीप पोळ यांनी केली.