यवतमाळ : शहरालगतच्या चौसाळा जंगलात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या युवकाच्या मृतदेहाचं गुढ अखेर उलगडलं आहे. पोलिस तपासातून याचा उलगडा झाला असून मुख्याध्यापक पत्नीनेच पतीवर विषप्रयोग करून त्याचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटे मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकला. आरोपी पत्नीची तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.
शंतनू अरविंद देशमुख (३२, रा. सुयोगनगर) यांचा तो मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न झाले. शंतनू १३ मेच्या सायंकाळपासून बेपत्ता होते. ते सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे शिक्षक होते, तर त्याच ठिकाणी पत्नी निधी (२३) ही मुख्याध्यापिका होती. प्रेमविवाह असल्याने तो आई-वडिलांपासून विभक्त राहत होता. जंगलात मृतदेह मिळाल्याची माहिती पसरताच शंतनूसोबत बारमध्ये असणाऱ्या मित्रांमध्ये कुजबुज सुरू झाली. पोलिसांनी मित्रांची चौकशी सुरू केली. त्यावेळी एकाच्या मोबाइलमध्ये शंतनूचा १३ मे रोजीचा फोटो दिसला. त्याच्या अंगातील सदरा आणि मृतदेहाजवळील कापडाचा तुकडा हे दोन्ही सारखेच होते. येथूनच पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली.
प्रारंभी निधीने पोलिसांना गुंगारा दिला. मात्र, तिच्या घरात आढळलेली अंडरवेअर व मृतदेहाच्या अंगातील अंडरवेअर एकाच कंपनीची असल्याने पोलिसांचा संशय बळावला. तिच्यावर मानसिक दबाव निर्माण करताच निधीने हत्येचा संपूर्ण घटनाक्रमच कबुलीतून सांगितला. मृतदेह जाळण्यास मदत केलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुगलवरून तयार केले विष
शंतनू दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यापासून सुटका मिळविण्यासाठी निधीने हत्येचा कट रचला. तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केले. ते दारूच्या नशेत असलेल्या शंतनूला पाजल्याने त्याचा मृत्यू झाला.