पितृछत्र हरपलेल्या प्रीतेशने यूपीएससी परीक्षेत मारली बाजी

रवींद्र मोराणकर
जळगाव : देशात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या परीक्षेत पितृछत्र हरपलेल्या प्रीतेश अशोक बाविस्कर या तरुणानेही बाजी मारली आहे. विशेष म्हणजे कासोद्यासारख्या ग्रामीण भागात किराणा दुकान सांभाळून मुलाला घडविणाऱ्या उज्ज्वला अशोक बाविस्कर या मातेचा तो सुपुत्र आहे. प्रीतेशच्या यशामुळे कासोदा गावात आनंदाचे वातावरण आहे.

वैकल्पिक विषय वगळता आपण कोणताही क्लास लावलेला नव्हता. पण आपली जिद्द होती, वडिलांचे 2010 मध्ये निधन झाले. त्यानंतर आईने सांभाळ केला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण एरंडोल येथील आर.टी. काबरे विद्यालयात झाले. यानंतर नाशिक येथील कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा केला. पुढे पुणे येथील आर.एम.डी. कॉलेजमधून मॅकेनिकल इंजिनिअरींगमध्ये बी.ई. पदवी घेतली. या दरम्यान इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून एम.ए. राज्यशास्त्र केले. रोज सहा ते सात तास नियमितपणे अभ्यास करायचो. तसेच संबंधित प्रश्नपत्रिका सोडवायचो. चौथ्या प्रयत्नात हे यश मिळाले, असे प्रीतेशने ‌‘तरुण भारत’ला सांगितले. आज जाहीर झालेल्या निकालात 767 वी रँक मिळाली आहे. यापुढे ‌‘आयएएस’साठी प्रयत्न करायचे आहेत. त्याशिवाय थांबणार नसल्याचेही प्रीतेशने स्पष्ट केले.

वडील नसल्याची उणीव -उज्ज्वला बाविस्कर
प्रीतेश सहावीत असताना त्याचे वडील वारले. आज मुलाने यश मिळविल्यानंतर त्यांची उणीव परिवाराला आहे, असे प्रीतेशचा सांभाळ करणाऱ्या त्याची माता उज्ज्वला बाविस्कर यांनी सांगितले. एका डोळ्यात दु:खाचे अश्रू, तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. भगवंताला हे करवून घ्यायचे होते. प्रीतेश हा आठवीत असताना तेव्हा राजेश पाटील हे कलेक्टर (आयएएस) झाले होते. तेव्हा त्यांनी गावात स्पर्धा परीक्षा ठेवली होती. तेव्हा राजेश पाटील यांची होणारी प्रेरणादायी भाषणे ऐकून प्रोत्साहन मिळायचे. त्यांचे कासोदा गावात येणे-जाणे, त्यांचा रुबाब पाहून तेव्हा तोही म्हणायचा, ‌‘आई, मलाही कलेक्टर व्हायचे आहे, त्यासाठी काय करावं लागतं’, असं तो विचारायचा. त्यावेळी मी त्याला बोधकथा सांगायची. प्रीतेश हा आर.टी. काबरे विद्यालयातील साऱ्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. त्याची मेहनत, शाळेतील शिक्षकांसह विविध घटकांचा त्याच्या यशात सहभाग आहे, असेही उज्ज्वला बाविस्कर यांनी सांगितले.