“पृथ्वीबाबाचं मुख्यमंत्रीपद वाचलं”, अजित पवारांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ

नागपूर : “काँग्रेस-राष्ट्रवादीतील बिघडलेले संबंध आणि त्याचा तत्कालीन आघाडी सरकारवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता पृथ्वीराज चव्हाण यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यातील एकाची निवड करण्यासंदर्भात शरद पवार यांना फोनही आला होता. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने दिल्ली गाठली आणि हायकमांडचे मनपरिवर्तन करीत आपले पद वाचवले,” असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवार, १२ डिसेंबर रोजी केला.

नागपूर येथील येथील ‘सुयोग’ या पत्रकार निवासस्थानाला मंगळवारी अजित पवार यांनी भेट दिली आणि पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पवार म्हणाले की, “२०१४ मध्ये चव्हाण यांच्यासोबतचे आमचे संबंध विकोपाला गेले होते. त्याला अनेक कारणे होती. वास्तविक त्यावेळी विरोधी पक्षात असलेली शिवसेना आणि भाजपा हेच काँग्रेसचे विरोधक असायला हवे होते. मात्र, ते राष्ट्रवादीच पहिल्या क्रमांकाचे विरोधक आणि शत्रू समजत होते. याची कल्पना दिल्लीतील त्यांच्या वरिष्ठांना देखील आली असावी आणि म्हणून काँग्रेसच्या हायकमांडने विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीच पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता.”

“यासंदर्भात अहमद पटेल यांनी शरद पवार यांना माहिती दिली. तसेच राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि बाळासाहेब थोरात या तिघांपैकी एक नाव निश्चित करण्यास सांगण्यात आले. त्यादरम्यानच्या काळात अहमदनगर येथे एका आमदाराच्या मुलाच्या लग्नाला मी उपस्थित होतो. तेथे माझ्या शेजारी राधाकृष्ण विखे–पाटील येऊन बसले आणि त्यांनी मला सांगितले, पृथ्वीराज चव्हाण यांना हटवून मला मुख्यमंत्री केले जाणार आहे. त्यामुळे सरकारमध्ये तुम्हाला कोणते सचिव हवे आहेत, ते मला सांगा, त्याप्रमाणे आपण बदल करूया,” असा दावाही अजित पवार यांनी केला.

म्हणून सरकारचा पाठिंबा काढला
पृथ्वीराज चव्हाण आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावेळी त्यांना राज्यात नेतृत्त्व बदलाच्या हालचालींची कुणकुण लागली. ते तडक सोलापूरला आले, तिथून मुंबईला येऊन त्यांनी रात्री दिल्ली गाठली. राहुल गांधी परदेशात होते आणि त्याच दिवशी ते रात्री दिल्लीला परतणार होते. त्यामुळे चव्हाण यांनी विमानतळावरच राहुल गांधी यांची वाट बघायचा निर्णय घेतला. रात्री केव्हा तरी पृथ्वीराज चव्हाण आणि राहुल गांधी यांची विमानतळावर भेट झाली आणि ते मुंबईला परतले. नंतर अहमद पटेल यांचा शरद पवार यांना फोन आला, ‘जे काही आधी ठरले होते ते सगळे आता रद्द झाले आहे आणि पृथ्वीराज चव्हाणच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार आहेत’. त्यानंतर चव्हाण यांच्या कारभाराला कंटाळून विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि १४ सप्टेंबर २०१४ रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली, अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.