मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीनंतर पुन्हा शरद पवार अजित पवारांसोबत जाण्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान भाजपने शरद पवार यांना दोन मोठ्या पदांची ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्या शरद पवार यांच्यासोबत ज्या भेटीगाठी वाढल्या आहेत, त्यामागे या ऑफर्सवरील चर्चा असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांना भाजपकडून दोन मोठ्या ऑफर देण्यात आला असल्याचा गौप्यस्पोट काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफर्सवर खुलासा केला आहे. यासंबधीते वृत्त ‘फ्रि प्रेस जर्नल’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे. भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतमध्ये शरद पवार यांना ही ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते, असं सांगण्यात आलं आहे. जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामावून घेण्याची ऑफर देण्यात आल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे. अजित पवार हे नुकतेच दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांनी अजित पवारांना शरद पवार यांना हा प्रस्ताव सांगण्यास सांगितलं असल्याचं समजतं.