मुंबई : गुजरात सरकारने आज ११ रोजी मुंबईत व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे या ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ रोड शो’चं नेतृत्व करणार आहेत. महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना गुजराला नेण्यासाठी, गुजरातमध्ये आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या कार्यक्रमाला हजर असणार आहेत, यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका होऊ लागली आहे.
मुंबईतील ताजमहाल पॅलेस हा कार्यक्रम होईल. त्यानंतर मुंबईमध्ये रोड शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट (VGGS) 2024 च्या रोड शोचे नेतृत्व करणार आहेत. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या यशाची 20 वर्षे पंतप्रधानांची ‘विकसित भारत@2047’ ची संकल्पना आणि त्यासाठी गुजरातची तयारी याविषयी मुख्यमंत्री भाषण करतील.
नवी दिल्लीच्या शुभारंभ कार्यक्रमामध्ये 1500 हून अधिक गुंतवणूकदार आणि उद्योजकांचा सहभाग होता. 119 हून अधिक डिप्लोमॅट्सनी मिशन प्रमुखांशी संवाद साधला. नवी दिल्लीतील कार्यक्रमाच्या भव्य यशानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकार मुंबईत रोड शो आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. हा कार्यक्रम फिनटेक, आयटी, बँकिंग वित्तीय सेवा आणि विमा अशा विविध क्षेत्रांमध्ये तसेच गुजरातच्या आगामी मेगा प्रकल्पांमध्ये मोठ्या गुंतवणुकीला आकर्षित करेल.
या रोड शोला अर्थ, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स मंत्री श्री. कनुभाई देसाई, उद्योग मंत्री श्री बलवंतसिंह राजपूत, राज्यमंत्री (गृह आणि पोलीस गृहनिर्माण, उद्योग, सांस्कृतिक उपक्रम) श्री हर्ष संघवी, राज्यमंत्री (MSME, कुटीर, खादी आणि ग्रामीण उद्योग, नागरी विमान वाहतूक) श्री जगदीश विश्वकर्मा आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य प्रधान सचिव श्री के. कैलाशनाथन उपस्थित राहणार आहेत.