---Advertisement---
पाचोरा : शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून मंजूर केलेल्या अनुदानात गैरव्यवहार करणाऱ्या लिपिकावर निलंबनाची कारवाई करावी, असा प्रस्ताव पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे.
ऑक्टोबर २०२४ ला अतिवृष्टीत खरिपाचे नुकसान झाले होते. त्यात शासनाने नुकसान भरपाई अनुदान मंजूर केले. त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप लिपिक अमोल सुरेश भोई याच्यावर आहे. त्याच्याविरोधात कारवाई सुरु आहे. त्याप्रकरणी त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
पाचोरा तहसील कार्यालयातून लिपिक अमोल सुरेश भोई याच्याकडे अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना देण्याचे काम सोपविले होते. मात्र त्याने या रकमेचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. त्याची चाळीसगाव कार्यालयात बदली झाली आहे. मात्र सुरुवातीस गेल्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत नसल्याच्या तक्रारी आल्या. त्यानुसार लाभार्थ्यांची यादी प्रत्येक गावात प्रदर्शित करण्याच्या सूचना केल्या.
याद्या ग्रुपवर पाठवताच अमोल भोई याने संबंधित क्लार्कला यादी अपलोड करू नका. माझ्याकडे मूळ यादी आहे ती टाकतो, असे सांगून चौकशीत बेबनाव केला. मात्र संबंधित क्लर्कने यादी अपलोड करताच आंबेवडगाव येथील तलाठी यांनी यादीची प्रत काढून ती चावडीवर लावली. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांची नावे व आधार नंबर वेगळाच दिसल्याचे ५३ शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांची तत्काळ चौकशी केली असता त्यांचे पैसे अन्य गावात दिल्याचे दिसले. याप्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.