जळगाव : जिल्ह्यातील केळी हे पीक संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. मागील काही कालावधीत या केळी पिकांवर अनेक संकट आली आहेत. केळीची पीकं आणि शेतकरीही धोक्यात आले आहेत. त्यामुळे केळी महामंडळाच्या औचित्याचा मुद्दा भाजप आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत उपस्थित केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागील काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात आले होते. तेव्हा त्यांनी केळी महामंडळासाठी 100 कोटीची तरतूद करणार असल्याचं घोषित केलं होतं. परंतु अद्यापही केळी महामंडळाची स्थापनाच झालेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही. त्यामुळे केळी महामंडळाची स्थापना तातडीने करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत केली.
आमदार संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवेदन दिले. राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार असून या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.