जळगाव : राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी एक बातमी जळगाव जिल्ह्यातून समोर आली आहे. चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यावर पिस्तूलने गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाच्या ठिकाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात टाकळी प्रचा गावाचे माजी सरपंच व महाविकास आघाडीचे नेते किसन जोर्वेकर याने आपल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण पिस्तूलाने गोळी घालून मारून टाकण्याची भाषा केली.
नेमकं काय म्हणाले किसन जार्वेकर?
मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं. छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी त्यांना संपवून टाकेल. माझं वय 73 वर्षे आहे. मला कॅन्सर आणि डायबिटीस आहे. माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी घालून टाकेल. भर सभेत उपस्थितांना संबोधीत करताना जार्वेकरांनी अशी धमकी दिली आहे. धमकीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून जार्वेकर यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा त्यावेळी तेथे माजी खासदार उन्मेष पाटील आणि माजी आमदार राजीव देशमुख हे देखील उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण काय म्हणाले ?
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून अजूनही चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते सावरलेले नाहीत. त्याच नैराश्यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली धरणे आंदोलन करत आहेत. हे चाळीसगाव आहे, येथे अशा विकृत राजकारणाला कधीच थारा मिळाला नाही आणि मिळणारही नाही. अशा समाजविघातक प्रवृत्तीला पुढे करून जर कुणी राजकारण करणार असेल तर त्याला निवडणूकीत जागा दाखवण्याची ताकद देखील चाळीसगावच्या सुज्ञ जनतेमध्ये आहे. असे वक्तव्य आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
कडक कारवाईची मागणी – ना. गिरीश महाजन
हा अतिशय गंभीर प्रकार आहे. एका व्यासपीठावर उभे राहून माईकमधून गोळ्या घालण्याचे धमकी देणे व त्यात जगण्याचे स्वारस्य नाही यापेक्षा गंभीर घटना असू शकत नाही. जबाबदार पदाधिकारी समोर असे बोलतात व ते बसून टाळ्या वाजवता. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही गोष्ट टाकून कडक कारवाईची मागणी करणार असल्याचे ना. गिरीश महाजन म्हणाले.