‘तरुण भारत’ च्या गोरमाटी (बंजारा) भाषेतील विशेषांकाचे महाकुंभात प्रकाशन!

तरुण भारत लाईव्ह ।३० जानेवारी २०२३। जामनेर तालुक्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा व लबाना-नायकडा समाजाच्या कुंभाचा आज पाचवा दिवस. दिवसेंदिवस गर्दी वाढतच आहे. कुभांच्या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’ने गोरमाटी (बंजारा) भाषेत प्रसिद्ध केलेल्या ‘महाकुंभ’ या विशेषांकाचे मोठ्या थाटात प्रकाशन झाले.

महाकुंभात रविवारी झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात अतिशय भक्तीमय वातावरण होते. याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते व देशभरातून आलेल्या संतांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला.
गोरमाटी (बंजारा) भाषेत पुरवणी प्रकाशनाचे हजारो उपस्थितांनी स्वागत व कौतुक केले, तर व्यासपीठावरील मान्यवरांनी ‘तरुण भारत’च्या अनोख्या उपक्रमाला दाद दिली. ‘तीर्थपीठा’वरील या सोहळ्यास प्रामुख्याने पू.अमर लिंगनाजी, पू. रायसिंगजी महाराज, पू. यशवंतजी महाराज, पू.नरोत्तम प्रकाश स्वामीजी, पू.रामानंदाचार्य राजराजेश्वराचार्य गोपाल चैतन्य महाराज, पू. हिंदू भूषण श्यामजी महाराज, ह.भ.प. अर्जुन महाराज, पू. बद्ददू नायक, पू.बाबुसिंग महाराज, पू.जितेंद्रनाथ महाराज, पू.कैलास महाराज, कर्नाटक, राज्यातील मंत्री प्रतापराव, यांच्यासह ‘तरुण भारत’ परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.

विशेषांकाचे कौतुक
बंजारा भाषेत प्रसिद्ध झालेल्या या विशेषांकाचे कार्यक्रम स्थळी प्रकाशनानंतर हजारो प्रतिंचे वाटप करण्यात आले. अनेक जण अतिशय कौतुकाने आपल्या म्हणजे बंजारा भाषेत प्रसिद्ध झालेल्या विशेषांकाचे मोठ्या कुतुहलाने वाचन करीत असल्याचे दृश्य या ठिकाणी होते.