पुणे लोकसभा पोटनिवडणूक : ‘आम्ही..’, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले आहे. बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला. त्यानंतर आता या मतदारसंघात पोटनिवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांना विचारले असता, त्यावर सध्या बोलणं योग्य होणार नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

काय म्हणाले बावनकुळे? 
पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा हा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. आम्ही आमचा उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाऊ, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसेच आमची त्यांना विनंती असेल की त्यांनी उमेदवार देऊ नये, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीने सर्वात आधी संजय राऊत नावाचा सकाळी नऊ वाजताचा भोंगा बंद करावा. राज्यात दंगली सारख्या घटना होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेली भूमिका ही कौतुकास्पद आहे. अशीच भूमिका इतरही विरोधी पक्षाचे नेते घेतील अशी अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने चंद्रकांत खैरेंसारखे ठाकरे गटाचे नेते प्रक्षोभक वक्तव्य करून आगीत तेल टाकण्याचं काम करत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे.