Punjab Haryana border: पंजाब हरियाणा बॉर्डरवर नेमकं घडतंय तरी काय ?

  Punjab-Haryana border :    २०० शेतकरी  संघटना विविध मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने कूच करणार आहे.  हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजित कपूर यांनी अंबालाला लागून असलेल्या शंभू सीमा भागाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून हरियाणा पोलिसांनी ट्रॅफिक ॲडव्हायजरी जारी केली आहे.यासाठी  सरकारने पंजाब-हरियाणा बॉर्डर सील केली असून अनेक जिल्ह्यांतील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

 

११ फेब्रुवारी सकाळी ६ वाजेपासून १३ फेब्रुवारीपर्यंत इंटरनेटसह एसएमएस सेवा बंद ठेवण्याचे आदेशच सरकारने दिले आहे. त्यानुसार, मोबाइल कंपन्यांनी अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा येथील इंटरनेट सेवा बंद केली आहे.

 

शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चामुळे अंबाला, जिंद आणि फतेहाबाद जिल्ह्यांमध्ये पंजाब आणि हरियाणामधील सीमा सुरक्षित करण्यासाठीही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.  राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलांच्या ५० तुकड्या तैनात केल्या आहे.

 

चंदीगडहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांनी डेराबस्सी, बरवाला/रामगढ, साहा, शाहबाद, कुरुक्षेत्र मार्गे किंवा पंचकुला, NH-344 यमुनानगर इंद्री/पिपली, कर्नाल या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.