पुणे । राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळत असून असह्य उकाड्यामुळे नागरिक अक्षरक्ष: हैराण झाले आहे. यातच उकाड्यातून दिलासा देणारा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. राज्यात 6 मेपर्यंत राज्यात तापमानाचा पारा वाढताच राहणार असून यानंतर 7 ते 11 मे दरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह, विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार, तर काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचाही अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
पूर्व विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान, विजांचा गडगडाटासह वादळी पाऊस होईल. 7 मेच्या आधी हळद, कांदा काढून झाकून ठेवा, कारण त्यानंतर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही 7 मेपासून पुढील पाच दिवस जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी 6 मेपर्यंत कांदा, कापूस, हळद पिकांची काढणी करुन ते नीट झाकून ठेवा, असा सावधगिरीचा इशारा डख यांनी दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही हे पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हा पाऊस ऊसाच्या पिकासाठी फायदेशीर असणार आहे. यासोबतच कोकणातही 7 मेपासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत उन्हाळ्यात झालेल्या पावसापेक्षा 7 ते 11 मे दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रात 8 ते 11 मे दरम्यान अवकाळी पावसासह मुंबईत देखील पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुण्यातही पावसाची शक्यता आहे. 7 ते 11 मे दरम्यान महाराष्ट्रात विविध भागात पावसाची शक्यता आहे.