भुसावळ : खंडणीच्या गुन्ह्यात बी फायनल पाठवण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 16 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी (Bribery case in Bodwad ) बोदवडचे हवालदार वसंत नामदेव निकम (52, आयटीआय कॉलनी, जामनेर) यांच्यासह खाजगी पंटर एकनाथ कृष्णा बावस्कर (65, रा.जलचक्र बु.॥) यांना शनिवारी दुपारी अटक करण्यात आली होती. संशयीतांना रविवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तिसर्या आरोपीविरोधात गुन्हा
बोदवड तालुक्यातील पत्रकारासह चौघांविरोधात दाखल गुन्ह्यात बी वा सी फायनल पाठवण्यासह चॅप्टर केस स्थानिक स्तरावर करण्यासाठी हवालदार निकम यांनी तडजोडीअंती पंटराच्या माध्यमातून 16 हजारांची लाच स्वीकारली होती. बोदवड तहसीलच्या आवारात शनिवारी सकाळी 11.30 वाजता झालेल्या या कारवाईप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. संशयीतांना रविवारी तपासाधिकारी निरीक्षक संजोग बच्छाव यांनी भुसावळ न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, लाच मागणी प्रकरणात शिवाजी ढोले या इसमाचे नाव पुढे आले असून गुन्हा दाखल होताच ते पसार झाले आहेत. एसीबी पथकाकडून संशयीताचा कसून शोध सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी दिली.