नंदुरबार : पती मुलांसह पत्नीला मारहाण करताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेजारणीलाच रॉडने मारून ठार केल्याची घटना समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी येथे ११ एप्रीलला रात्री अकरा ते बाराच्या सुमारास ही घटना घडली. सिंदाबाई सेमट्या वसावे (वय ६०) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुकयातील भांग्रापाणी येथे वसंत होमा वसावे हा त्याची पत्नी व मुलांना राहत्या घरी मारहाण करीत होता. या दरम्यान शेजारी राहत असलेली सिंदाबाई सेमट्या वसावे व सेमट्या पारशी वसावे हे भांडण सोडविण्यास गेले. याचा राग येऊन वसंत वसावे याने सीलिंग फॅनच्या लोखंडी मोटारीसह असलेल्या दांड्याने तोंडावर व पायावर मारून गंभीर दुखापत केली.
या मारहाणीत सिंदाबाई यांचा मृत्यू झाला, तर सेमट्या पारशी वसावे यास देखील गंभीर दुखापत करून ठार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारावरून सेमट्या वसावे यांच्या फिर्यादीवरून मोलगी पोलिस ठाण्यात वसंत होमा वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे.