भुसावळ : विशेष रस्ता अनुदानातून शहरातील 12 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर शहरातील 23 रस्त्यांच्या कामांचे आदेश पालिकेने कंत्राटदाराने दिले होते मात्र वेळेत संबंधित ठेकेदाराने कामे पूर्ण केली नसतानाच आता अपूर्ण रस्त्यांचा प्रश्न विधानपरीषदेत आ. एकनाथराव खडसे यांनी तारांकीत प्रश्नाद्वारे मांडून लक्ष वेधल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खडसेंच्या प्रश्नावर शहरातील रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
असे आहे नेमके प्रकरण
पालिकेने विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत 12 कोटींच्या 23 कामांसाठी मे. विनय सोनू बढे अॅण्ड कंपनी या ठेकेदाराला कार्यारंभ आदेश ऑगस्ट 2020 मध्ये दिले मात्र वारंवार मुदतवाढ देवूनही ठेकेदाराने काम पूर्ण केले नाही तर आता मार्च अखेरपर्यंत निधीची राज्य शासनाने दिलेली मुदत संपत असतानाही कामे पूर्ण न झाल्याने पालिकेने ठेकेदारास नोटीस बजावत मुदतीत काम पूर्ण न झाल्यास त्याची जबाबदारी आपणावर राहिल तसेच सुरक्षा अनामत जप्तीची तंबी दिली आहे. मुळात सात रस्ते 2020 पासून झाले नसताना ते आता मार्चअखेर पूर्ण होणे अशक्यच आहे त्यामुळे निधी परत जाण्याची भीती आहे.
खडसेंनी वेधले तारांकीत प्रश्नाद्वारे लक्ष
आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परीषदेत 12 कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे मंजूर असतानाही रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे जानेवारी 2023 मध्ये निदर्शनास आले असून एकाच रस्त्याची दोन कामे मंजूर करण्यात आल्याने याबाबत विनोदकुमार जैन यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे तक्रार केल्याबाबत प्रश्न उपस्थित करीत दोषींवर काय कारवाई केली? याची विचारणा केली होती मात्र मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उत्तर देताना 12 कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे मंजूर असून रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याचे जानेवारी 2023 मध्ये निदर्शनास आली असल्याचे सांगितले तसेच कार्यादेश देण्यात आलेल्या रुपये 11.09 कोटींच्या कामांपैकी 7.09 कोटी इतक्या रकमेची कामे पूर्ण झाली असून चार कोटी इतक्या रकमेची कामे प्रगतीपथावर असल्याची तसेच एकाच रस्त्याची दोन कामे मंजूर करण्यात आल्याची तक्रार नसल्याचे उत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले ; रस्त्यांची कामे प्रगतीपथावर
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे 03 ऑक्टोबर 2022 रोजी तक्रार दाखल असून हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे दाखल तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीमध्ये तक्रारदाराने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गांधी चौक हा रस्ता पूर्ण करण्याबाबत विनंती केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने भुसावळ नगरपरीषदेच्या सहमतीने या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे तसेच शहरातील मंजूर इतर रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, विशेष रस्ता अनुदानातील कामे अडीच वर्षांपासून रेंगाळली असून वारंवार मुदतवाढ मिळूनही मंजूर रस्त्यांपैकी 35 टक्के कामे अद्याप पूर्ण झाली नसताना व मार्च अखेरपर्यंत ती पुर्ण होण्याची शक्यता नसताना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.