तरुण भारत लाईव्ह । १० मे २०२३। संध्याकाळी भूक लागल्यावर काहीतरी वेगळं खायला हवं असत, अशावेळी काय वेगळं कराव हा प्रश्न पडतो तर अशावेळी तुम्ही सोयाबिन चिली करू शकता अगदी झटपट आणि चविष्ट होणार हा पदार्थ आहे. सोयाबीन चिली घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
१०० ग्रॅम सोयाबीन वड्या, दोन ते तीन सिमला मिरची, दोन ते तीन मध्यम कांदे, एक कप बारीक चिरलेला कोबी, तीन ते चार हिरव्या मिरच्या, दोन चमचे सफेद तीळ, १५ ते २० लसूण पाकळ्या, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, दोन वाटी मक्याचे पीठ, पाव वाटी तांदळाचे पीठ, सोया-चिली-टोमॅटो सॉस प्रत्येकी एक मोठा चमचा, चवीनुसार मीठ, आवश्यकते नुसार तळायला तेल.
कृती
सगळ्यात आधी सोयाबीन वड्या जराशा उकडून घ्याव्यात. मका आणि तांदळाचे पीठ एकत्र करून, त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला टाकून, जरासं घट्ट मिश्रण बनवून घ्या. मग त्यात उकडलेल्या सोयाबीन वड्या टाकून ते सर्व तयार पीठ वड्यांना लागेल असं बघा. नंतर गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत छान कुरकुरीत तळून घ्या. कांदा आणि सिमला मिरची चौकोनी आकारात कापून ते सुद्धा मध्यम स्वरूपात तळून घ्या.
बारीक चिरलेला कोबी, लसूण, हिरवी मिरची एकत्र दुसऱ्या कढईत अथवा फ्राय पॅनमध्ये छान एकत्र गरम करून, त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस टाकून छान गरम करा. त्यात आता तळलेल्या सोयाबीन वड्या, कांदा, सिमला मिरची टाकून छान एकत्र जरा गरम करा, मग त्यावर सफेद तीळ घालून सर्वाना गरम गरम सर्व्ह करा.