‘रघा’: सामाजिक भान जागविणारी कादंबरी

तरुण भारत लाईव्ह जळगाव : कुशल प्रशासक व उत्तम नॅनोटेक सायंटिस्ट म्हणून नावाजलेले प्रोफेसर डॉ.एल.ए.पाटील यांनी समाजभान जागविण्याच्या उदात्त हेतूने ‘रघा’ अर्थात ‘रघुनाथ’ या नायकाच्या जीवनशैलीचे उत्कृष्ट रेखाटन आपल्या रघा या कादंबरीत केले आहे. पद्मगंधा प्रकाशनने प्रसिद्ध केलेली ही कादंबरी २४८ पृष्ठांची आहे. या कादंबरीसाठी व्यक्त केलेले मनोगत प्रेरणादायी आहे.

प्रच्युरपणे ज्ञान सांगणार्‍यास ‘प्राचार्य’ असे म्हणतात आणि ज्ञानाचे आचरण करणार्‍या व्यक्तीस ’आचार्य’ असे म्हणतात, अशा अर्थाच्या संस्कृत सुभाषिताप्रमाणे रघासरांनी कर्तव्यदक्ष व कुशल प्राचार्य या नात्याने महाविद्यालयास ‘अ + +’ दर्जा मिळवण्यात प्राध्यापक -शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी या सर्वांना सोबत घेऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रघा सरांचे सर्वांना कार्यप्रवण करणे हे अत्यंत प्रेरणादायी आहे.

रघा सरांचा संघर्ष, त्यांचे यश, त्यांची दुःखे, त्यांच्या स्वभावातील खाचाखोचा यांची अत्यंत स्पष्टपणे केलेली मांडणी या कादंबरीत वाचावयास मिळते. एक विचारशील व निर्भय माणूस आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या महाविद्यालयासाठी, नियत संशोधन कार्यासाठी व्यग्र असा रघा असून स्वतंत्र बुद्धी, उत्साही वृत्ती, कामाचा प्रचंड आवाका, वाचताना पहावयास मिळते. आपल्या एकूण कार्यकाळात समताधिष्ठित भूमिका घेऊन आपल्या महाविद्यालयातील उपेक्षित समाज घटकातील प्राध्यापक, शिक्षक -शिक्षकेतरांना प्रमुख या नात्याने समतेची, न्यायाची वागणूक दिल्याची नोंद रघा वाचताना घेतल्याचे दिसते. तद्वतच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासंदर्भात शैक्षणिक संस्था व शासन स्तरावरून ठोस पावले उचलण्याची अपेक्षा रघाने व्यक्त केलेली दिसते.

‘रघा’ ही कादंबरी नैतिक व न्याय्य लढ्याचे आख्यान मांडणारी संघर्षगाथा आहे. दर्जेदार ग्रंथाच्या परंपरेला साजेशी अशी ही कादंबरी आहे. रघाचे लेखक व सामाजिक भान असलेले बुद्धिवंत प्रोफेसर डॉ. एल. ए. पाटील यांच्या लेखणीला उत्तरोत्तर असेच लिहीत राहण्याचे बळ मिळत राहो ही मनोकामना.

-प्रा. डॉ. डी. एन. वाघ

माजी अध्यक्ष, इतिहास अभ्यास मंडळ, कबचौउमवि, जळगाव

सजावट मांडणी – संदीप माळी