तरुण भारत लाईव्ह । १८ मे २०२३। नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. यात अनेक महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणीची भाकरी खायला आवडत नसेल तर तुम्ही नाचणी-बटाटा कटलेट घरी बनवू शकता. नाचणी-बटाटा कटलेट घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
१ वाटी मोड आलेली नाचणी, २ उकडलेले बटाटे, १ मोठा चमचा बेसन, १ चमचा लाल मिरची पावडर, १ चमचा धणे पावडर, १ चमचा जिरे पावडर, १ चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा साखर, १ वाटी कोंथिबीर, १ कोवळा पातीचा कांदा, १ वाटी पोहे, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती
सर्वप्रथम, मोड आलेली नाचणी मिक्सरला थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्यावी व एका पातेल्यात घेऊन, त्यात उकडलेले बटाटे कुस्करून घालावेत. नंतर त्यात बेसन आणि सर्व मसाले घालावेत. साखर घालावी. पातीचा कांदा, तसेच कोथिंबीर बारीक चिरून घालावी. चवीपुरते मीठ घालून मग सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. पोहे मिक्सरला सरसरीत वाटून घ्यावे व या मिश्रणात घालून एकत्र करावे. त्यामुळे मिश्रणाला घट्टपणा येईल. फ्राय पॅनमध्ये थोडे थोडे तेल घालून छोटे छोटे कटलेट शॅलो फ्राय करावेत. हे पौष्टिक कटलेट खूप चविष्ट आणि कुरकुरीत लागतात. हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.