नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेली भारत जोडो यात्रा लवकरच जम्मू काश्मीरला पोहचणार आहे. मात्र ही यात्रा काश्मीरमध्ये पोहचण्याआधीच पक्षाला मोठा झटका लागला आहे. कारण पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि प्रवक्त्या दीपिका पुष्करनाथ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. दीपिका पुष्कर नाथ या कठुआत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात वकील होत्या. दीपिका पुष्कर नाथ यांनी आपण लाल सिंह यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचं सांगितलं आहे.
लाल सिंह हे प्रदीर्घ काळापासून काँग्रेस खासदार होते. मात्र २०१५ मध्ये जेव्हा भाजपा आणि पीडीपी यांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. कठुआ बलात्कार प्रकरणात लाल सिंह यांनी आरोपींची बाजू घेतली होती. हेच लाल सिंह हे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यामुळेच आपण काँग्रेस पक्ष सोडत आहोत असं दीपिका पुष्कर नाथ यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरला जात आणि धर्मामध्ये वाटू पाहणार्या व्यक्तीसोबत मी एकाच मंचावर बसू शकत नाही त्यामुले मी माझा पक्ष सोडते आहे असं दीपिका पुष्कर नाथ यांनी सांगितलं आहे. माझ्याकडे राजीनामा देण्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही असंही दीपिका पुष्कर नाथ यांनी स्पष्ट केलं.
दीपिका पुष्कर नाथ म्हणाल्या की कठुआ बलात्कार प्रकरणात लाल सिंह यांनी बलात्कार्यांची बाजू घेतली होती. जम्मू काश्मीरमधल्या हिंदू आणि मुस्लीम समाजात दुही माजवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. वैचारिक पातळीवर मी अशा माणसासोबत कधीही एका मंचावर बसू शकत नाही. त्यामुळे मी पक्ष सोडते आहे या आशयाची ट्विट्स दीपिका पुष्कर नाथ यांनी केली आहेत.