नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सातत्याने भाजप, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका करताना दिसतात. यातच काँग्रेसने राहुल गांधी यांचा नॉर्वेतील एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधताना दिसत आहेत. परदेशात जावून टीका करुन देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न राहुल गांधींकडून होत असल्याची टीका आता होवू लागली आहे.
विरोधकांची इंडिया आघाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ला भारताच्या संस्थानांवर नियंत्रण मिळवू देणार नाही. लोकशाहीची हत्या सहन केली जाणार नाही. ही लढाई संपलेली नाही. अनेक जण या लढाईत सहभागी झाले आहेत. ही लढाई आम्ही जिंकू, असे राहुल गांधींनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. विरोधी आघाडीतील सहभागी सर्व पक्षांची हीच भावना आहे की, लोकशाहीची हत्या सहन केली जाणार नाही. देशाच्या संस्थांवर आरएसएसला ताबा मिळवू देणार नाही, यावरही सर्वांचे एकमत असल्याचे राहुल गांधी या व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.
दरम्यान, विरोधकांच्या इंडिया आघाडीत मतभेद असल्याचे राहुल गांधी यांनी मान्य केले. देशातील काही राज्यांत इंडिया आघाडीत मतभेद आहेत. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे ध्येय समोर ठेवून इंडिया आघाडी कार्यरत आहे. महात्मा गांधी, गौतम बुद्ध आणि गुरु नानक यांच्या विचारांवर चालणारा भारत देश आहे. देशाच्या भविष्याचा विचार करून वैचारिक संघर्ष केला जात आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.