नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानतंर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर राहुल गांधीं चांगलेच भडकले, त्यांनी थेट पत्रकारांवर आरोप करत तुम्ही स्वतःला पत्रकार का म्हणवता? असा प्रश्न केला.
का भडकले राहुल गांधी?
पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की, कोर्टाचा जो निर्णय आला त्यावरुन तुम्ही ओबीसींचा अपमान केला असा प्रचार तुमच्याविरोधात करत आहे, यावर तुमची भूमिका काय? हा प्रश्न येताच राहुल गांधी भडकले ते म्हणाले, आत्ताच्या आता पत्रकारांनी तीन वेळा याबाबत प्रश्न विचारला. आपण इतकं थेटपणे भाजपसाठी का काम करता आहात. करत असाल तर ते देखील चर्चेद्वारे करा, जर तुम्हाला भाजपचं काम करायचं तर तसा भाजपचा बॅच छातीवर लावून फिरा. तेव्हा मी तुम्हाला आत्ता जसं उत्तर दिलं तसंच उत्तर देईन. आम्ही पत्रकार आहोत असं दाखवू नका.
दरम्यान, भाजपनं आता राहुल गांधींनी मोदी या ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, त्यामुळं त्यांनी याप्रकरणी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी करत राहुल गांधींविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. याच भाजपच्या आंदोलनावरुन पत्रकारानं राहुल गांधींना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला होता.
खासदारकी का रद्द?
मोदी या आडनावावरुन टिप्पणी केल्यानं राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. याच खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर खासदाराला कोर्टानं दोषी ठरवल्यानं आणि शिक्षा सुनावल्यानं कायद्यानुसार, लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींची खासदारकी रद्द केली.