इंग्लंड : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर पंतप्रधान मोदींची स्तुती केली आहे. मोदी सरकारने महिलांसाठी आणलेली उज्ज्वला योजना आणि लोकांची बँक खाती उघडणे हे एक चांगले पाऊल असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली आहे. इंग्लंडच्या केंब्रिज केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या दोन धोरणांचं कौतुक केलं आहे.
केंब्रिजमधील कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींना मोदी सरकारच्या भारताच्या हिताच्या धोरणांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या चांगल्या धोरणांबद्दल सांगताना उज्ज्वला योजना आणि जन धन योजनेचा उल्लेख केला. राहुल गांधी म्हणाले की, कदाचित महिलांना गॅस सिलेंडर देणे आणि लोकांची बँक खाती उघडणे हे एक चांगले पाऊल असेल.
मोदींवर टीका
राहुल गांधींनी यावेळी मोदींवर टीकाही केली. भारतात धार्मिक विविधता आहे. शीख, मुस्लीम, ख्रिश्चन हे सर्व भारतात आहेत पण मोदी त्यांना द्वितीय श्रेणीचे नागरिक मानतात. हे मला मान्य नाही. माझ्या मते मोदी भारताची रचना बिघडवत आहेत, असंही ते म्हणाले.
भारताची लोकशाही धोक्यात आहे. माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, त्यांनी स्पाय सॉफ्टवेअर पेगासचाही उल्लेख केला. विरोधी नेत्यांना बोलण्यासाठी तुरुंगात टाकले जाते. असे अनेक वेळा झाले आहे, असंही राहुल गांधींनी सांगितलं.